मराठी संगीत विश्वातील ‘देव’ हरपला, यशवंत देव यांचे निधन
- मराठी संगीत विश्वावर आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले.
- यशवंत देव यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे मिळाले. तेच त्यांचे पहिले गुरू होते. त्यांच्याकडून त्यांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते.
भारताच्या टेनिस दुहेरीत दिविज अव्वल स्थानी
- जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा दिविज शरण ३८ व्या स्थानासह भारतातील अव्वल क्रमांकाचा दुहेरीचा टेनिसपटू ठरला आहे. रोहन बोपन्नाची नऊ स्थानांनी घसरण झाल्याने तो ३९ व्या स्थानी पोहोचला आहे. तर लिएंडर पेस ६० व्या स्थानी असल्याने दिविजला भारतीय टेनिसपटूंमध्ये अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी मिळाली. तर भारताचा दुहेरीतील आणखी एक टेनिसपटू जीवन नेदुचेझियानला ७२ वे स्थान मिळाले असून ते त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च आहे.
- ‘‘दुहेरीत कारकीर्द गाजवलेल्या बोपण्णा, भूपती आणि पेससारख्या खेळाडूंच्या साथीने मला दुहेरीत वरचे स्थान मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे. दुहेरीतील अव्वल १०० खेळाडूंमध्ये भारताचे सात खेळाडू असणेदेखील भूषणावह आहे.
भारताची दणदणीत विजय; केला ‘हा’ विक्रम
- ND vs WI : चौथ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजला भारताकडून २२४ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या विजयाबरोबर भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला.
- बर्म्युडा संघाविरुद्ध २००७ साली भारताने वन डे इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला होता. या सामन्यात भारताने २५७ धावांनी बर्म्युडा संघाला पराभूत केले होते. त्यानंतर २००८ साली हाँगकाँगविरुद्ध २५६ धावांनी भारताने दुसरा मोठा वन डे विजयमिळवला. त्यामुळे आजचा विजय हा भारतासाठी तिसरा मोठा विजय ठरला. भारताने आज विंडीजला केवळ १५३ धावांवर बाद केले आणि २२४ धावांनी विजय मिळवला.
- याबरोबरच विशेष म्हणजे हा भारताचा घरच्या मैदानावर सर्वात मोठा वन डे विजय ठरला. तसेच कसोटी खेळणाऱ्या एखादया संघाविरुद्धची हा भारताचा सर्वात मोठा विजय ठरला.