दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक मृणाल सेन कालवश
- सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. ‘पद्मभूषण’, ‘दादासाहेब फाळके’ यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचं योगदान दिलं.
- मृणाल यांनी १९५५ मध्ये ‘रातभोर’ या आपल्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र यातून खचून न जाता त्यांनी १९६० मध्ये ‘बाइशे श्रावण’या चित्रपटाची निर्मिती केली.
- हा चित्रपट चांगलाच गाजला. मृणाल यांचा जन्म १४ मे १९२३ मध्ये फरीदपुरमध्ये झाला. हे शहर बांगलादेशमध्ये आहे. मृणाल यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’चं दिग्दर्शन ही त्यांनी केलं होतं.
- मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय आणि १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
पंतप्रधान अंदमानात; ३ बेटांची नावे बदलली
- अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक या द्वीपांची नावे बदलण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही तिन्ही द्वीपं आता अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद आणि स्वराज या नावांनी ओळखली जातील, असे पंतप्रधानांनी सांगितले.
- पोर्ट ब्लेयरमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम तिरंगा फडकावला होता. त्याला आज ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी द्वीपांच्या नामांतराची घोषणा केली. नेताजींच्या इच्छेनुसारच ही नावे बदलण्यात आली आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
- पोर्ट ब्लेयरमधील साउथ पॉइंटवर पंतप्रधानांच्या हस्ते दीडशे फूट उंचीच्या तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच अंदमान-निकोबार बेटांवर आलेल्या मोदींनी सी-वॉलसह विविध विकास योजनांची आज पायाभरणी केली. कार निकोबारमध्ये सात मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र व सौर गावाचे लोकार्पण करण्यात आले.