Current Affairs 01 June 2020
आजपासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात
- देशभरात आजपासून म्हणजेच 1 जूनपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड‘ ही योजना लागू होणार आहे.
- तर या योजनेमुळे रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरकारने ठरवलेल्या दरात अन्नधान्य विकत घेऊ शकणार आहेत.
- तसेच आतापर्यंत रेशन कार्ड धारक ज्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड तयार करत त्याच जिल्ह्यात त्यांना रेशन घेता येत होते. परंतु, आता आता सर्व लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार आहे.
- सुप्रीम कोर्टाने देशात अशा प्रकारची योजना लागू व्हावी यासाठी केंद्र सरकारला आदेश दिले होते. अखेर ही योजना 1 जून पासून संपूर्ण देशभरात लागू होत आहे.
- ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.
- तर यासाठी ओडिसा, मिझोरम आणि नागालँड ही 3 राज्ये देखील तयार होत आहेत. एकूण 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेच्या शुभारंभासाठी सज्ज असणार आहेत.
- ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पीडीएस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. पीडीएस मशीनच्या आधारे लाभार्थ्यांना ओळखले जाईल. या योजनेसाठी सरकारला सर्व रेशन दुकानांवर पीडीएस मशीन बसवावी लागेल.
- तसेच या योजनेसाठी नवे रेशनकार्ड बनवायची किंवा जुनं रेशन कार्ड जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपल्या जुन्या रेशन कार्डमार्फतही योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- रेशन कार्ड दोन भाषांमध्ये राहतील. पहिली म्हणजे स्थानिक भाषा आणि दुसरी भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू मिळतील. दरम्यान, ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, ते ऑनलाईन अर्ज दाखल करुन रेशन कार्ड मिळवू शकतात.
खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटची शिफारस
- जागतिक कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विनेश फोगटची खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे.
- तर रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे.
- टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेली विनेश ही सध्या भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे. गेल्या वर्षीदेखील खेलरत्नसाठी तिची शिफारस झाली होती. मात्र कुस्तीपटू बजरंग पूनियाला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. गेल्या तीन वर्षांत विनेशची सातत्यपूर्ण कामगिरी झाली आहे.
- तसेच जकार्ता येथे आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, 2019 मध्ये नूर सुलतान येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, या वर्षांच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे आशिया कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक अशी कामगिरी विनेशने केली आहे.
- साक्षी मलिकला 2016 मध्ये खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. मात्र तरीदेखील तिने अर्जुन पुरस्कारासाठी निवड व्हावी असा अर्ज पाठवला आहे.
नेपाळमध्ये नकाशासाठी घटना दुरुस्ती विधेयक सादर
- भारताच्या सीमेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या नकाशामध्ये बदल करण्याचा उद्देशाने नेपाळ सरकारने रविवारी संसदेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक मांडले. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या नेपाळ कॉंग्रेसनेही या कायद्याला पाठिंबा दिल्यानंतर नेपाळ सरकारच्यावतीने कायदा, न्याय आणि संसदीय कामकाज मंत्री शिवमय तुंबहंगपे यांनी हे विधेयक मांडले, हे घटनेत दुरुस्ती करणारे दुसरे विधेयक असेल.
- नेपाळने अलीकडेच देशाचा सुधारित राजकीय व प्रशासकीय नकाशा जाहीर केला आहे. या नकाशाद्वारे नेपाळने लिपुलेख, कलापानी आणि लिंपियाधुरा या संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या भूभागांवर हक्क सांगितला आहे. मात्र या दाव्याद्वारे नेपाळने केलेल्या आपल्या भूमीच्या विस्ताराला भारताने जोरदार आक्षेप घेतला आहे.
- राज्यघटनेच्या अनुसूची 3 मध्ये समाविष्ट असलेल्या नेपाळच्या राजकीय नकाशामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव या नवीन विधेयकात करण्यात आला आहे. या विधेयकाच्या मंजूर होण्याने नेपाळचा भौगोलिक आणि राजकीय नकाशा बदलणार आहे.