बँक ऑफ बडोदा ठरली दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक
- 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू झाले आहे. यामुळे भारतातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे.
- तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018च्या अखेरीस दिलेल्या तत्वत: मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.
- भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 मार्च 2019ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत.
- तसेच विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.
आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदावर ‘मनू साहनी’
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी म्हणून माध्यम व्यावसायिक मनू साहनी यांनी पदभार स्वीकारला. विद्यमान कार्यकारी डेव्ह रिचर्डसन हे त्यांच्यासमवेत जुलैतील विश्वचषकाच्या समारोपापर्यंत कार्यरत राहणार असून त्यानंतर ते निवृत्ती स्वीकारणार आहेत.
- ईएसपीएन स्टार स्पोर्ट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज केलेले साहनी हे या कालावधीच्या अंतिम सहा आठवडय़ांमध्ये रिचर्डसन यांच्यासमवेत कामकाज करून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याबाबत दक्षता घेणार आहेत.
- साहनी यांची नियुक्ती जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी रिचर्डसन जुलैपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. आयसीसीच्या वतीने शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साहनी यांची निवड केली होती.
आशियाई स्पर्धेत भारतीय नेमबाजांची सुवर्ण कमाई
- भारतीय नेमबाजांनी आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीदेखील पाच पदकांची कमाई करीत स्पर्धेवरील वर्चस्व कायम राखले.
- या स्पर्धेत भारताने 16 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. स्पर्धेत भारताने 16 सुवर्णसह 5 रौप्य आणि 4 कांस्यपदके अशी 25 पदके मिळवली आहेत. Indian-Shooter
- स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी यशवर्धन आणि श्रेया अग्रवाल यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. यशने 10 मीटर एअर रायफलच्या कनिष्ठ पुरुष गटात तसेच सांघिक गटात केवल प्रजापती आणि ऐश्वर्य तोमरसह सुवर्णपदक मिळवले.
- तसेच कनिष्ठ रायफल मिश्र सांघिक गटात यशवर्धनने श्रेयासह सुवर्णपदकावर नाव कोरत तीन सुवर्ण मिळवले. तर श्रेयाने दुसरे सुवर्ण 10 मीटर एअर रायफल कनिष्ठ महिला गटात मिळवले.
- तर महिलांच्या सांघिक गटात मेहुली घोष आणि कवी चक्रवर्ती यांच्याबरोबर तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीमुळे भारतीय नेमबाजांमध्ये चांगला आत्मविश्वास निर्माण झाला असून संयुक्त अरब अमिरातमध्ये 5 एप्रिलपासून होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भारताला भविष्यात अधिक पदकेदेखील मिळू शकतील.
सेन्सेक्स सार्वकालिक उच्चांकावर, ३९ हजारचा टप्पा पार
- आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने ऐतिहासिक शिखर सर केला असून सेन्सेक्सने ३९ हजारचा पल्ला ओलांडला आहे. तर निफ्टीनेही ११, ७०० चा टप्पा ओलांडला आहे.
- २०१८-१९ या चालू वित्त वर्षांतील सेन्सेक्स तसेच निफ्टीचा प्रवास गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम राहिला. या दरम्यान मुंबई निर्देशांक १७.३० टक्क्यांनी तर निफ्टी १४.९३ टक्क्यांनी वाढला होता. दुहेरी अंकवाढ मिळवून देणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सरत्या आर्थिक वर्षांत ८.८३ लाख कोटी रुपयांची भर पडली होती. सोमवारी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात उत्साह दिसून आला.
- सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला आणि सेन्सेक्सने ३९, ००० चा पल्ला ओलांडला. तर निफ्टीने ११, ७०० चा पल्ला गाठला. निफ्टीने यापूर्वी ३ सप्टेंबर २०१८ रोजी ११, ७०० चा टप्पा ओलांडला होता. सेन्सेक्सने सुरुवातीला उसळी घेतली असली तरी काही वेळात सेन्सेक्स ३८, ९४१. ११ अंकांवर स्थिरावला.
देशात पहिल्यांदाच तृतीयपंथाचा सामूहिक विवाह : गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद
- रायपूरमध्ये पार पडलेला हा विवाह सोहळा विशेष होता. या सामुहिक विवाह सोहळ्याचं महत्त्व जाणून गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.
- देशात समलैंगिकतेला मान्यता मिळाल्यानंतर पहिल्यांदाच रायपूर येथे तृतीयपंथीयांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये घोड्यावरून आलेल्या 15 नवरदेव मंडळींनी तृतीयपंथांशी लग्न केलं. हे लग्न बघण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
- या लग्नाचं खास आकर्षण होतं ते म्हणजे देशातील पहिला मिस ट्रान्स क्वीन वीणा शेंद्रे हिचं. या लग्न सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून वीणा उपस्थित होती.