⁠  ⁠

चालू घडामोडी : ०३ जानेवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 03 january 2020

वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात ६७ हजार बालकांचा जन्म

baby dies

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल ३ लाख ९२ हजार ७८ बालकांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे. बालकांसाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संस्थेनं याबाबत माहिती दिली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक म्हणजेच ६७ हजार ३८५ बालकांचा जन्म झाला. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन असून चीनमध्ये ४६ हजार २९९ बालकांचा जन्म झाला.
युनिसेफनं सादर केलेल्या आकड्यांनुसार तिसऱ्या क्रमांकावर नायजेरिया असून त्या ठिकाणी १ जानेवारी रोजी २६ हजार ३९ बालकांचा जन्म झाला. त्यानंतर पाकिस्तान (१६,७८७), इंडोनेशिया (१३,०२०), अमेरिका (१०,४५२), कांगो (१०,२४७), इथिओपिया (८,४९३) आणि पाकिस्तान (६,७८७) या देशांचा क्रमांक येतो.
दरम्यान, जन्माचा पहिला दिवस आई आणि बाळासाठई खडतर असतो. तर ४० टक्के बालकांचा मृत्यू हा त्यांच्या जन्माच्या दिवशीच होतो, असं युनिसेफकडून सांगण्यात आलं. जगभरात जन्माला येणाऱ्या बालकांबाबत युनिसेफनं काही तथ्य मांडली आहेत. २०१८ मध्ये जन्मलेल्या २५ लाख बालकांनी जन्माच्या पहिल्याच महिन्यात आपले प्राण गमावले होते.

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्याने नवे राजकीय नाटय़

mn01r

महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्याने नवे राजकीय नाटय़

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्राचा चित्ररथही पाहायला मिळणार नाही. राज्याच्या सांस्कृतिक खात्याने दिलेला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाच्या विशेष समितीने नाकारला आहे.
चित्ररथाच्या निवडीपूर्वी सर्व राज्यांना बैठकीसाठी बोलावले जाते. चर्चेच्या तीन-चार फेऱ्या झाल्यानंतर निवडीच्या प्रक्रियेला वेग येतो. पण यंदा राज्याच्या सांस्कृतिक खात्यासोबत तीन वेळा बैठक झाली. या बैठकांमध्ये कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराला ३५० वर्षे झाल्यानिमित्ताने चित्ररथ, महाराष्ट्राची वस्त्रपरंपरा, महाराष्ट्रातील नाटय़परंपरेची १७५ वर्षे आणि गीतरामायण अशा चार संकल्पना समितीला सादर करण्यात आल्या होत्या. मात्र हे सर्व प्रस्ताव नाकारण्यात आले.
दर वर्षी फक्त १६ राज्यांच्याच चित्ररथांची निवड केली जाते. दर तीन ते चार वर्षांतून एकदा त्या-त्या राज्याला संचलनात स्थान दिले जात नाही. प्रत्येक राज्यांना संधी मिळावी यासाठी राज्यांची आलटून-पालटून निवड केली जाते.
प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला प्रत्येक राज्य आपली संस्कृती आणि परंपरांचे दर्शन दिल्लीतील संचलनात घडवत असते. महाराष्ट्राच्या चित्ररथात मांडलेल्या संकल्पनांचे नेहमीच कौतुक होत असते. त्यामुळे राज्यासाठी या संचलनातील चित्ररथ हा अस्मितेचा मुद्दा ठरतो. २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ सादर केला होता. त्याला प्रथम पुरस्कार मिळाला होता. राज्याने १९९३, १९९४, १९९५ असे सलग तीन वर्षे हा पुरस्कार पटकावला होता.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रतिनिधित्व न मिळण्याचे प्रसंग याआधी १९७२, १९८७, १९८९, १९९६, २०००, २००५, २००८, २०१३, २०१६ मध्येही घडले होते.

जागतिक तापमानवाढीचा नद्यांना धोका

rivers

जागतिक तापमानामध्ये एक अंश सेल्सियसने वाढ झाल्यास नद्यांवर जमणारे बर्फाचे आच्छादन नेहमीच्या तुलनेमध्ये सहा दिवस आधीच वितळत असल्याचे अभ्यासाअंती आढळून आले आहे. याचे आर्थिक आणि पर्यावरणीय दुष्परिणामही भोगावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात भविष्यातील धोके दर्शवण्यात आले आहेत. या अभ्यासासाठी गेल्या ३४ वर्षांत उपग्रहाद्वारे काढण्यात आलेल्या ४ लाख छायाचित्रांचा वापर करून तुलना करण्यात आली. वर्षभरात ठराविक काळात गोठणाऱ्या जगभरातील नद्यांबाबत त्यानंतर विश्लेषण करण्यात आले. वर्षातील काही काळ गोठणाऱ्या नद्यांचे प्रमाण जगभरातील एकूण नद्यांच्या ५६ टक्के आहे
सन १९८४ ते ९४ आणि २००८ ते २०१८ या काळातील बर्फाच्छादित नद्यांच्या स्थितीची तुलना करण्यात आली. जागतिक पातळीवर ०.३ ते ०.४ टक्क्यांनी बर्फ तयार होण्याचे प्रमाण होत असून तिबेटचे पठार, पूर्व युरोप आणि अलास्कामध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. नद्यांवरील बर्फाच्छादन कमी होण्याच्या स्थितीचा भविष्यवेधही घेण्यात आला आहे. २००९ ते २०२९ आणि २०८० ते २१०० या काळात बर्फाच्या घटणाऱ्या प्रमाणाची स्थिती यात मांडण्यात आली आहे. उत्तर गोलार्धात थंडीच्या काळात ९ ते १५ टक्के आणि उन्हाळ्यात १२ ते ६८ टक्क्यांनी हे प्रमाण घटू शकते. रॉकी पर्वतरांगा, उत्तर पूर्व अमेरिका, पूर्व युरोप, तिबेट पठारावर सर्वाधिक परिणाम दिसण्याची भीती आहे. तापमानवाढीने होणाऱ्या परिणामांची दाहकता यातून लक्षात येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासेम सुलेमानी ठार

अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले आहेत.
गेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेने हा हल्ला अशावेळी केला आहे जेव्हा बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता.

Share This Article