Current Affairs 04 August 2020
देशातील सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूर चौथ्या क्रमांकावर
- गेल्या काही वर्षांपासून देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतही नागपूरचा क्रमांक लागू लागला आहे.
- यंदाच्या उन्हाळ्यात तसा अनुभवही आला. मात्र यंदा पहिल्यांदाच देशातील सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचा क्रमांक लागला आहे.
- ३ ऑगस्ट रोजी नागपुरात देशातील चौथ्या क्रमांकाच्या पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली.
- रविवारी देशात केरळ राज्यातील वडाकरा येथे सर्वाधिक १६ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
- त्याखालोखाल तामीलनाडूमधील देवाला येथे १५, तर अंदमान निकोबारमधील लाँग आयलँड येथे १३ आणि नागपूर येथे १२ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
स्पेस एक्सची अवकाशकुपी सुखरूप परत
- अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले. या मोहिमेने अवकाश प्रवासाचे खासगीकरण होण्यात महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
- पुढील वर्षी खासगी अवकाश पर्यटन सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.
- नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे.
- बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही. ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती. नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले.
- यापूर्वी नासाचे अवकाशवीर अशाच पद्धतीने २४ जुलै १९७५ रोजी पॅसिफिकमध्ये अवकाशकुपीतून परतले होते. ही अवकाशकुपी वेग कमी करत पृथ्वीच्या वातावरणात येते व नंतर अलगदपणे समुद्रात पाडली जाते. आताच्या मोहिमेत डग हर्ले व बॉब बेन्केन हे स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलच्या मदतीने परत आले असून शनिवारी ते अवकाशस्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले होते. त्यानंतर त्यांची ही अवकाश कुपी मेक्सिकोच्या आखातातील पेन्साकोला येथे उतरली, वादळग्रस्त फ्लोरिडापासून हे ठिकाण जवळच आहे. एका विशिष्ट उंचीवर आल्यानंतर अवकाशकुपीचे पॅराशूट खुले करण्यात आले त्यामुळे अवतरण सुरक्षित झाले.
‘बीसीसीआय’च्या कोव्हिड कृती दलाची स्थापना
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोव्हिड कृती दलाची स्थापना केली असून त्यामध्ये माजी कर्णधार राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे.
- द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख आहे. द्रविडकडे कोव्हिड कृती दलाचा प्रमुख म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
- ‘एनसीए’चा प्रमुख म्हणून द्रविडसह वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता अधिकारी यांचा समावेश आहे.