Uncategorized
Current Affairs 05 April 2019
पंतप्रधान मोदींना ‘यूएई’चा सर्वोच्च पुरस्कार
- संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) सर्वोच्च मानला जाणारा ‘झायेद मेडल’ हा पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. पुढाकार घेऊन भारत आणि यूएईमधील आंतरराष्ट्रीय संबंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार मोदींना देण्यात येणार आहे.
- झायेद मेडल हा पुरस्कार यूएईचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग, ग्रेट ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांना याआधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांमध्ये यूएई आणि भारतातले संबंध सुधारण्यासाठी, आर्थिक देवाण-घेवाण वाढवण्यासाठी, मैत्रीपूर्ण नाते संस्थापित करण्यासाठी मोदींनी मेहनत घेतली आहे.
- इतिहासात कधीही नव्हते इतके चांगले आंतरराष्ट्रीय संबंध भारत-यूएईमध्ये प्रस्थापित झाले आहेत. मागच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी नाहायन भारताचे प्रमुख अतिथीही होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
अंतराळात भारताचे सामर्थ्य वाढणार; इस्रो ५ लष्करी उपग्रह सोडण्याच्या तयारीत
- अंतराळात भारताचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या वर्षात पाच लष्करी उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. याची तयारीही सुरु झाली असून नुकतेच दोन टेहळणी उपग्रह अवकाशात सोडून या कार्यक्रमाचा इस्रोने शुभारंभ केला आहे. या उपग्रहांमुळे सुरक्षा रक्षकांची निरिक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. त्यासाठी आणखी अत्याधुनिक सैन्य उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.
- पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण केले जात असल्याने तसेच हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचालींमध्ये झालेली वाढ यामुळे इस्रोचा दृष्टीकोन बदलला असून आता इस्रोने आपले संपूर्ण लक्ष्य अंतराळात भारताला सक्षम बनवण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे.
- जुलैमध्ये रिसॅट-2BR1, ऑक्टोबरमध्ये रिसॅट-2BR2, नोव्हेंबरमध्ये रिसॅट-2B लॉन्च करण्यात येणार आहे. रिसॅट-2B मालिका ही गुप्त उपग्रहांचे सूक्ष्म स्वरुप आहे. यामध्ये एक्स-बँड सिंथेटिक अपर्चर रडार बसवण्यात आले आहेत. हे रडार ढगांच्या पलिकडीलही छायाचित्रे घेऊ शकतात. तसेच या छायाचित्रांना १ मीटर रिझॉल्युशनपर्यंत झूम करु शकतात.
google pay: ‘यूपीआय’ व्यवहारांत ‘गुगल पे’ अग्रस्थानी
- ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’च्या माध्यमांतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये ‘गुगल पे’ने अन्य पर्यायांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. अन्य पर्याय आणि ‘गुगल पे’च्या माध्यमातून होणाऱ्या डिजिटल व्यवहारांमध्ये २५ टक्क्यांचा फरक असल्याचे आढळून आले आहे.
- ‘गुगल पे’चा प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या ‘पेटीएम’ने मात्र एकूण व्यवहारांच्या संख्येत आघाडी घेतली असून, त्या पाठोपाठ ‘फोन पे’ आणि ‘गुगल पे’चा क्रमांक लागतो.
- मार्च २०१९अखेर ‘गुगल पे’च्या माध्यमातून ~ ४३,००० कोटी ते ~ ४५,००० कोटींचे व्यवहार झाले. त्यापाठोपाठ ‘फोन पे’ आणि ‘पेटीएम’ यांचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांच्या माध्यमातूनही मार्च महिन्यात प्रत्येकी जवळपास ~ ३१,००० कोटी रुपये ते ~ ३२,००० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. एकूण व्यवहारांचा विचार करता मार्च २०१९ अखेरीस ‘पेटीएम’, ‘फोन पे’ आणि ‘गुगल पे’ यांच्या माध्यमातून अंदाजे २२.५० कोटी व्यवहार झाले आहेत. त्यामध्ये ‘फोन पे’ आणि ‘गुगल पे’ यांच्या तुलनेत ‘पेटीएम’ने अल्प आघाडी घेतली आहे.
सलग दुसऱ्यांदा दरकपात
- केंद्र सरकारच्या इच्छेनुसार दास यांनी तीन महिन्यांत दोनवेळा पतधोरणात व्याजदर घटवले आहेत. केंद्र सरकारच्या इच्छेनुरूपच व्याजदरांत कपात करण्यात आली असल्याचा दावा अर्थतज्ज्ञांनी केला आहे.
- मागील तीन महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने दोनदा व्याजदरांत कपात केल्याने व्याजाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्धा टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे गृह, वाहन आणि सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे.
- रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो आणि रेपो दरात पाव टक्का कपात केल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत कर्जे आणखी स्वस्त होणार आहेत.
शाहरुखला लंडनमधील विद्यापीठाकडून मानद पदवी बहाल
- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान म्हणजेच किंग खानला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता लंडनमधल्या विद्यापीठानं शाहरूखला मानद पदवी देऊन गौरवले आहे. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’कडून त्याला लोककल्याण विषयातील पदवी प्रदान करण्यात आली.
- शाहरूखनं मानवी हक्क, न्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.
- शाहरूख खान ‘मीर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे महिला सबलीकरण , पुनर्वसन आणि मानवी हक्कांसाठी काम करतो.