⁠  ⁠

चालू घडामोडी : ०५ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 05 February 2020

राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम

l 10

ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेली आणि माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने ४९ किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.
मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८८ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचलत एकूण २०३ किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाईची सहकारी संजिता चानू हिने १८५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने १६८ किलो वजनासह कांस्यपदक प्राप्त केले.
मीराबाईने मंगळवारी साकारलेल्या या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी मजल मारली. ती चीनची जियांग हुईहुआ (२१२ किलो) आणि होऊ झिहुई (२११ किलो) आणि कोरियाची री संग गम (२०९ किलो) यांच्यानंतर चौथ्या स्थानी आहे.

कौतुकास्पद! ई-कचऱ्यापासून २२ वर्षीय भारतीय तरुणाने बनवले ६०० ड्रोन

Drone

कर्नाटकमधील एन. एम. प्रताप या मुलाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ड्रोन वैज्ञानिक अशी ओळख मिळवली आहे.
प्रतापने ई कचऱ्यापासून एक दोन नव्हे चक्क ६०० ड्रोन आतापर्यंत तयार केली आहेत. ड्रोनच्या मदतीने सामान्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने प्रताप हे काम करत असल्याचे सांगतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संकटात सापडलेल्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हे ड्रोन वापरता यावेत असं प्रतापला वाटतं.
एकीकडे ड्रोनची आवड जपत दुसरीकडे प्रतापने आपल्या छंदाला साजेसं शिक्षणही घेतलं. त्याने मैसुरमधील जेएसएस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्समधून बीएसचीचे शिक्षण घेतले आहे.
आतापर्यंत प्रतापला ८७ देशांमधून आमंत्रित करण्यात आलं आहे. २०१७ साली जपानमधील टोकियो येथे झालेल्या टोकियो आंतरराष्ट्रीय रोबोटीक प्रदर्शनामध्ये त्याने सुवर्ण आणि रौप्य पदक आणि १० हजार डॉलरचे बक्षिस जिंकले होते. २०१८ साली जर्मनीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोमध्ये प्रतापला अलबर्ट आइन्स्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडल मिळालं होतं.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा

vijaya rahatkar new

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
विजया रहाटकर यांनी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सादर केला. एका जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत टिपण्णी केली होती. सरकार बदललं आहे. त्यामुळे विजया रहाटकर यांनी राजीनामा द्यायला हवा आणि 5 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने नव्या अध्यक्षांची नेमणूक करावी असाही आदेश न्यायालयाने दिला होता. हा आदेश कायद्यातील तरतुदींविरोधात असल्याने रहाटकर यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं.

वहिदा रेहमान यांना किशोर कुमार पुरस्कार प्रदान

VAHEEDA REHMAN

मध्य प्रदेश सरकारचा मानाचा 2018चा किशोर कुमार पुरस्कार देऊन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेशचे सांस्कृतीक मंत्री डॉ. विजयालक्ष्मी साधो यांनी रहमान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला.
दोन लाख रूपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खांडवा येथे किशोरकुमार यांच्या जयंतीला झालेल्या कार्यक्रमाला या 82 वर्षीय अभिनेत्री उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
रेहमान यांचा तीन फेब्रुवारीला वाढदिवस असतो, त्याबद्दलही साधो यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मध्यप्रदेशचे सांस्कृतिक खात्याचे मुख्य सचिव पंकज रागही यावेळी उपस्थित होते, असे सरकारच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share This Article