अमेठीत होणार आधुनिक एके-203 रायफलींची निर्मिती
- अमेठीत एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. अमेठीत बंद पडलेल्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात रशियाच्या सहकार्याने एके-203 या आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केली.
- एके-203 ही रायफल आधीच्या एके-47 रायफलची सुधारित आवृत्ती असेल. भारतीय जवानांसाठी याठिकाणी तब्बल साडेसात लाख आधुनिक रायफलींची निर्मिती करण्यात येईल असं संरक्षण मंत्री म्हणाल्या.
- या रायफल ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमा अंतर्गत बनणार आहेत. यामध्ये ऑर्डिनंस फॅक्ट्री बोर्ड जवळ मेजॉरीटी शेअर 50.5 टक्के तर रशियाकडे 49.5 टक्के शेअर्स असणार आहेत. अॅटोमॅटीक आणि सेमी अॅटोमॅटीक दोन्ही यंत्रणा या रायफलमध्ये आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघात 2014 नंतर पहिल्यांदाच सभा घेतली.
मंगळावर प्राचीन काळी पाणी असल्याचे भूगर्भशास्त्रीय पुरावे
- मंगळाच्या पृष्ठभागावर प्राचीन काळात एकमेकांशी जोडणारी पाण्याची तळी होती. त्यातील पाच तळ्यांमध्ये जीवसृष्टीस आवश्यक असलेली खनिजेही होती हे सिद्ध करणारे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
- नेदरलँडसमधील उत्रेख्त विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आताच्या काळात मंगळाची पृष्ठभूमी कोरडी वाटत असली तरी तेथे पूर्वी पाणी होते याच्या खुणा सापडल्या आहेत.
- गेल्या वर्षी युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेत मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा साठा सापडला होता. जर्नल ऑफ जिओफिजिकल रीसर्च- प्लॅनेटस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार प्राचीन काळात मंगळावर आताच्या प्रारूपांनी अंदाज केल्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी होते.
- साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी तेथे तळीही होती, त्यांचा व महासागराचा संबंध होता. मंगळावरील पाच विवरात जीवसृष्टीसाठी उपयुक्त असणाऱ्या काबरेनेट व सिलिकेटसारख्या खनिजांचे पुरावे मिळाले आहेत.
जीवन कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थानी
- दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्याने भारताच्या जीवन नेदुनचेझियान याला जागतिक क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम ६८ वे स्थान मिळाले आहे. मात्र, लिएंडर पेस हा २३ स्थाने घसरुन ९६ व्या स्थानी पोहोचला आहे.
- डावखुऱ्या जीवनने त्याचा सहकारी पुरव राजा याच्यासमवेत दुबईत दमदार कामगिरीची नोंद केली होती. त्यामुळे त्या दोघांना या कामगिरीचा लाभ झाला. त्यात राजाला १७ स्थानांची आघाडी मिळाल्याने तो ७९ व्या स्थानी पाहोचला आहे.
- दरम्यान रोहन बोपन्ना हा अद्यापही भारताचा अव्वल दुहेरी टेनिसपटू असून तो ३८ व्या स्थानावर आहे. तर त्याचा दुहेरीतील साथीदार दिविज शरण हा एका स्थानाने घसरुन ४० व्या स्थानावर आला आहे
धनंजय मुंडेंना कार्यक्षम आमदार पुरस्कार
- दि.०४ रोजी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- स्मृतीचिन्ह व ५० हजारांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
- सार्वजनिक वाचनालयातर्फे माजी आमदार व पत्रकार माधवराव लिमये यांच्या स्मृतीनिमित्त मागील १६ वर्षांपासून दिल्या जाणार्या या पुरस्कारासाठी यावर्षी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली होती.
- यापूर्वी हा पुरस्कार बी.टी.देशमुख, गणपतराव देशमुख, आर.आर.पाटील, शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीष बापट, सा.रे.पाटील, पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चु कडू, निलम गोर्हे, गिरीष महाजन यांना देण्यात आला आहे.
राज्यातील ‘लालपरी’ LNGवर धावणार, 1 हजार कोटींची बचत होणार
- डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाने आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी महामंडळाच्या 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी 1 हजार कोटींचा फायदा होईल असं रावते यांनी सांगितलं.
- यासाठी पहिल्या टप्प्यात 18 हजार एसटी बसेसमध्ये तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. या बदलासाठी एका बसवर किमान 1 लाख 50 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे.
- या निर्णायामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टळणार असून राज्यातील 18 हजार बसेस मध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत असे रावते यांनी सांगितले.
विदेशी कर्जांमध्ये ४५ टक्के घट
- भारतीय उद्योगांनी विदेशी बँकांकडून घेतलेल्या कर्जांमध्ये जानेवारीत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
- चालू वर्षाच्या पहिल्या महिन्यात भारतीय उद्योजकांनी विदेशातून घेतलेल्या कर्जांचा आकडा २.४२ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत सीमित राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ४५ टक्क्यांची घट दिसून आली.
- जानेवारी २०१८मध्ये भारतीय उद्योगांनी विदेशांतून ५.४० अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज घेतले होते. मात्र २०१८ व २०१९च्या जानेवारीमध्ये भांडवल उभारणीसाठी विदेशी रोख्यांचा उपयोग करण्यात आला नाही.
- विदेशांतून कर्ज घेण्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्या आघाडीवर आहेत.
महाराष्ट्राची पिछाडी
- थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) प्राप्त करण्यात चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत नवी दिल्ली आणि एनसीआरने महाराष्ट्राला मागे टाकून अग्रस्थान पटकावले आहे. केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन अँड इण्डस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड’ अर्थात ‘डीआयपीपी’च्या ताज्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१८-१९च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये दिल्ली आणि एनसीआरमध्ये ५७,३३३ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे.
- चालू आर्थिक वर्षाच्या (२०१८-१९) पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (एप्रिल ते डिसेंबर २०१८) या कालावधीत ‘एफडीआय’च्या बाबतीत दिल्ली-एनसीआर आणि महाराष्ट्रानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि गुजरातचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष २०१६-१७च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला होता.
- राज्यांमधील परकी गुंतवणूक
- (एप्रिल ते डिसेंबर २०१८)
- राज्य गुंतवणूक (कोटी रुपयांत)
- दिल्ली-एनसीआर – ५७,३३३
- महाराष्ट्र – ५६,४३६
- कर्नाटक – ३३,०१४
- आंध्र प्रदेश – १९,६७१
- तमिळनाडू – १४,१६६
- गुजरात – ११,७५४
जागतिक कुस्ती संघटनेचा भारताला झटका
- भारतीय कुस्ती महासंघाशी (WFI) सर्व संबंध तोडून टाकावेत, अशा सूचना जागतिक कुस्ती संघटनेनं इतर सर्व राष्ट्रीय संघटनांना दिले आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. त्यामुळं जागतिक कुस्ती संघटनेनं हा निर्णय घेतला आहे.
- पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारल्यानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं यापुढे भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे.