Current Affairs 05 March 2020
महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान

ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे आणि मुंबई येथील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांना यावेळी राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात 61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी देशभरातून 5 हजार कलाकारांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातील 15 सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करून त्यांना समारंभात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार कलाकारांना यावेळी गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तेजस्विनी सोनवणे यांना प्रिंट मेकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी सोनवणे यांनी 2017 मध्ये दक्षिण कोरियातील बुसान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.
मुंबईतील डोंबिवली(पूर्व)येथील सागर कांबळे यांना पेंटींग श्रेणीमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून क्रिएटिव्ह पेंटींगचे शिक्षण पूर्ण करून सागर कांबळे यांनी कला क्षेत्रातील प्रवास सुरू केला.
कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 24 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मुंबईच्या सायन येथील रतनकृष्ण साहा यांना मूर्ती कलेतील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आले.
मूर्ती कलेतील योगदानासाठी त्यांना विविध राज्यांचे पुरस्कार व शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.
मुंबईतील घाटकोपर(पश्चिम) येथील दिनेश पांड्या यांना आर्ट फोटोग्राफीतील उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
काश्मिरातील आयएएस अधिकारी राजीव रंजन निलंबित
बनावट कागदपत्रांच्या आधारे फार मोठय़ा प्रमाणात शस्त्र परवाने दिल्याच्या संबंधात सीबीआयने अटक केलेले आयएएस अधिकारी राजीव रंजन यांना निलंबित करण्याचा आदेश जम्मू- काश्मीर प्रशासनाने दिला आहे.
या प्रकरणाच्या संबंधात सीबीआयने अलीकडेच कुपवाडाचे दोन माजी जिल्हा दंडाधिकारी राजीव रंजन आणि इतरित हुसेन रफिकी यांना अटक केली आहे. अनुक्रमे २०१५ ते २०१६ आणि २०१३ ते २०१५ या कालावधीत कुपवाडाचे जिल्हा दंडाधिकारी असलेले रंजन व रफिकी यांची भूमिका सीबीआयने केलेल्या तपासात उघड झाली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सीबीआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले.
बीसीसीआयच्या निवड समिती-प्रमुख पदी माजी फिरकीपटू सुनिल जोशी

बीसीसीआयच्या निवड समिती-प्रमुख पदावर माजी फिरकीपटू सुनिल जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय क्रिकेट प्रशासकीय समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. ज्यात सुनिल जोशी आणि हरविंदर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
एम.एस.के.प्रसाद यांचा बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदावरचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता.
नवीन निवड समितीसमोर आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्याचं पहिलं काम असणार आहे.
आभासी चलन व्यवहारांना न्यायालयाची मान्यता

आभासी चलन व्यवहारांसाठी सुविधा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बँका व वित्तसंस्था यांना मंजुरी दिली. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २०१८ मध्ये एक परिपत्रक काढून बँका व वित्तसंस्थांना आभासी चलन व्यवहारांना मनाई केली होती.
आरबीआयचे परिपत्रक काय सांगते?
या परिपत्रकानुसार, आरबीआयच्या नियंत्रणाखालील कोणत्याही वित्तसंस्थेला आभासी चलनासंदर्भातील कोणतीही सेवा देता येणार नाही. यामध्ये आभासी चलन देणे, घेणे तसेच या चलनाची खरेदी-विक्री अशा व्यवहारांचा समावेश आहे.
दहा बँकांचे चार बँकांत एकत्रीकरणाला मंजुरी

सार्वजनिक (सरकारी) क्षेत्रातील सध्या कार्यरत १० बँकांचे एकत्रिकरण करून केवळ चारच सरकारी बँका ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत, येत्या १ एप्रिल २०२० पासून या महाविलीनीकरणाला मूर्तरूप देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
यानुसार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन होणार आहेत, तर सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण कॅनरा बँकेत होत आहे. आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचा समावेश युनियन बँक ऑफ इंडियात, तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत समाविष्ट होईल.
बँकांच्या महाविलीनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या २७ वरून १२ वर येणार आहे.
त्यात व्यवसायाच्या दृष्टीने सात मोठय़ा, तर पाच छोटय़ा बँकाच राहतील. २०१७ पासूनच्या विलीनीकरणानंतर वार्षिक ८ लाख कोटी व्यवसाय असलेल्या प्रत्येकी सात बँका झाल्या आहेत. ५२ लाख कोटी रुपये व्यवसायासह स्टेट बँक अव्वलस्थानी, तर पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या स्थानी आहे.
१६ वर्षीय शेफाली टी-२० क्रमवारीत नंबर-१
आयसीसी टी-२० क्रमवारीत भारताची शेफाली वर्मा (१६) अव्वल स्थानी पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० महिला विश्वचषक स्पर्धेत तिने सातत्याने शानदार बॅटिंग करत क्रमवारीत १९ स्थानांनी झेप घेतली आहे.