Current Affairs : 06 November 2020
झारखंडनेही आता सीबीआयला रोखलं
झारखंड राज्यानेही आता सीबीआयला राज्यात चौकशीसाठी निर्बंध आणले आहेत. सीबीआयला चौकशीसाठीची सामान्य संमती झारखंड सरकारकडून रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे यापुढे झारखंडमधील एखाद्या प्रकरणाची जर सीबीआयला चौकशी करायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारची त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.
पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ नंतर आता झारखंडनेही सीबीआयला राज्यात चौकशीसाठीची सामान्य संमती रद्द केली आहे. सीबीआयला रोखणारं झारखंड हे पाचवं बिगरभाजपा सरकार असलेलं राज्य ठरलं आहे.
लष्करप्रमुख नरवणेंनी स्वीकारली नेपाळची मानद जनरल रँक
नेपाळ दौऱ्यावर असलेले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना नेपाळ सरकारने मानद जनरल रँक देऊन सन्मानित केले.
नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी गुरुवारी नरवणे यांचा सन्मान केला.
उभय देशांच्या लष्करप्रमुखाचा सन्मान करण्याची परंपरा सन १९५० पासून भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी जपली आहे.
गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नेपाळचे लष्करप्रमुख जनरल थापा यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मानद जनरल रँक प्रदान करून सन्मान केला होता.
देशातील उत्कृष्ट राज्य बॅंक म्हणून राज्य सहकारी बँकेचा गौरव
नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक (नॅफस्कॉब) या देशपातळीवरील संस्थेने राज्य सहकारी बॅंकेचा (The Maharashtra State Co Op Bank) सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराचा वितरण सोहळा डिसेंबर २०२० मध्ये संपन्न होणार आहे.
भारतातील विविध राज्याच्या, राज्य सहकारी बँकांनी त्यांच्या वार्षिक धोरणानुसार शेतकऱयांसह विविध घटकांना केलेला कर्जपुरवठा, प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांना सक्षम करण्यासाठी पेलेले प्रयत्न, राज्यातील जिल्हा बँकांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणासह विविध स्तरावर केलेले प्रयत्न, केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी, रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक तत्वांचे केलेले पालन इत्यादी निकषांच्या आधारे सदर पुरस्कार दिला जातो.
या सर्व निकषांची पूर्तता करण्यामध्ये अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
बँकेने १०९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच अनेक विक्रम मोडले आहेत. त्यात प्रामुख्याने बँकेने दिलेली कर्जे २०८१७ कोटी, बँकेच्या ठेवी २०८४९ कोटी, एकूण व्यवहार ४१६६६ कोटी, बँकेचा सीआरएआर १३.११ टक्के, बॅंकेचा स्वनिधी ४७८४ कोटी, तर बँकेने ३२५ कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे.
बँकेच्या अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण प्रथमच शून्य टक्के झाले आहे.