Uncategorized
Current Affairs 07 February 2019
स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे पाटील
- भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. जानेवारीत स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करतील. ३२ वर्षीय नीला या ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
- नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहतील, अशी माहिती अशोक विखे पाटील यांनी ‘पीटीआय’ला दिली. स्वीडन येथे जन्म झालेल्या नीला या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. नीला या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.
- नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.
महाराष्ट्रातील चार कलाकरांना राष्ट्रपतींच्या हस्ते
संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान
- प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली.
- केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील 4 कलाकारांसह देशभरातील 42 कलाकारांना वर्ष 2017 चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आलं. अभिराम भडकमकर यांनी गेली दोन दशकं नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे. तर नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आलं. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी 1974 ते 1984 अशी सलग दहा वर्ष 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. शानबाग यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी ट्रम्प यांच्याकडून
डेव्हिड मालपास यांचे नामांकन
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेव्हिड मालपास यांना नामांकित केले आहे.
- वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ राहिलेले मालपस हे सध्या अमेरिकन सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहेत. डेव्हिड मालपस हे जागतिक बँकेचे मोठे टीकाकार राहिले आहेत.
- अशा धोरणांचा अवलंब केला जाईल, ज्यामुळे जागतिक बँक जगभर गरिबीविरोधात लढा देऊ शकेन आणि आर्थिक संधी वाढतील, असे मालपस यांनी सांगितले. मालपास यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास ते दक्षिण कोरियाचे जिम याँग किम यांचे स्थान घेतील. जिम यांनी नुकताच राजीनामा दिला होता.
- २०१६ मध्ये मालपस यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आर्थिक सल्लागाराचे काम केले होते.
दरम्यान, भारतीय वंशाच्या पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी याही जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष २०२२ मध्ये संपणार होता.
गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी कामधेनू आयोग
- गोवंश संरक्षण आणि संवर्धनासाठी ‘राष्ट्रीय कामधेनू आयोग’ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.
- राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेनंतर देशात गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी तसेच गोवंशाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. यात देशी गायींच्या संरक्षणाचाही समावेश आहे. या आयोगामुळे पशुधनाला बळकटी मिळेल. याचा लहान शेतकऱ्यांनाही फायदा होईल.
- हा आयोग पशुपालन, पशु विज्ञान आणि कृषी क्षेत्राशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारी महाविद्यालये, विभाग आणि संघटनांसोबत काम करणार आहे. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत मांडलेल्या २०१९-२० च्या अंतरिम अर्थसंकल्पातही या आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. देशात गोवंशाचा विकास आणि संरक्षणासाठी धोरणात्मक व्यवस्था आणि दिशा दाखवण्याचे काम हा आयोग करणार आहे. देशात गो-कल्याणासाठी नियमावली आणि कायद्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल, हे पाहण्याचे कामही हा आयोग करणार आहे.