प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी सर्वाधिक शहरे महाराष्ट्रात
राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमानुसार (एनसीएपी) प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी महाराष्ट्रात सर्वाधिक १८ शहरे आहेत. २०१७ ची प्रदूषण पातळी विचारात घेऊन या शहरांनी २०-३० टक्के प्रदूषण पातळी कमी करायची आहे. हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके सलग पाच वर्षे पूर्ण न करू शकणाऱ्या शहरांचा यात समावेश केला जातो.
प्रदूषणाची मानके पूर्ण न करणाऱ्यांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, आदी शहरांचा समावेश होतो. वसई-विरार महापालिका क्षेत्राचा यात अगदी अलीकडे समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील वायू प्रदूषणात सर्वाधिक वाटा वाहने, उद्योग आणि बांधकाम क्षेत्र (औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह) तसेच इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा आहे.
‘नासा’च्या गाडीची मंगळावर पहिली सफर !
नासाच्या परसिव्हिरन्स या बग्गीसारख्या गाडीने मंगळाच्या पृष्ठभागावर पहिला फेरफटका पूर्ण केला असून एकूण ६.५ मीटर अंतर या गाडीने कापले. विज्ञान प्रयोग सुरू करण्यापूर्वी गाडीने हे अंतर कापले आहे. ही गाडी किमान ३३ मिनिटे सफरीवर होती.
पहिले चार मीटर अंतर ही गाडी सरळ गेली, नंतर डावीकडे १५० अंश कोनातून वळली व २.५ मीटर अंतर कापून परत आली. सध्या ती एका तात्पुरत्या उभ्या राहण्याचा ठिकाणी आली आहे.
परसिव्हिरन्स रोव्हर गाडी ही नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने तयार केली असून या गाडीला एकूण सहा चाके आहेत. गाडी व्यवस्थित चालू आहे हे आता स्पष्ट झाल्याने वैज्ञानिकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
वैज्ञानिक उद्दिष्टे पूर्ण करताना रोव्हर गाडी २०० मीटरचे अंतर कापू शकेल.
बायडेन प्रशासनात आणखी दोन भारतीयांना स्थान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या प्रशासनात चिराग बेन्स आणि प्रोनिता गुप्ता या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना स्थान दिले आहे.
चिराग बेन्स यांना क्रिमिनल जस्टिससाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्त केले आहे आणि प्रोनिता गुप्ता यांना कामगारांच्या संबधित क्षेत्रासाठी राष्ट्राध्यक्षांचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचसोबत अतिरिक्त 20 सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामध्ये करोना रिस्पॉन्स टीम, वातावरण बदल धोरण, इंटरनल निती परिषद आणि राष्ट्रीय आर्थिक परिषद या क्षेत्रामध्ये काही सदस्यांची नियुक्ती केली आहे.
व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात सांगितलंय की, देशासमोरील असलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासनाने योग्य व्यक्तींची नियुक्ती केली आहे. त्यामाध्यमातून बायडेन प्रशासन देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.