अब्जाधीशांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर
प्रतिष्ठित अशा फोर्ब्ज मासिकाने जगातील श्रीमंतांची नवी यादी प्रसिद्ध केली असून, त्यानुसार अमेरिका व चीननंतर जगात अब्जाधीशांच्या संख्येत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी चिनी उद्योगपती जॅक मा यांना मागे टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचे स्थान परत मिळवले आहे.
फोर्ब्जच्या जगातील अब्जाधीशांच्या पस्तिसाव्या वार्षिक यादीत अॅमॅझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व संस्थापक जेफ बेझोस हे सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थानावर आहेत. त्यांची निव्वळ मालमत्ता १७७ अब्ज अमेरिकी डॉलरची असून अॅमॅझॉनच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या मालमत्तेत ६४ अब्ज डॉलरची भर पडली आहे.
जागतिक यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क हे असून, डॉलरच्या संदर्भात सर्वाधिक जास्त फायदा त्यांना झाला आहे. गेल्या वर्षीच्या यादीत २४.६ डॉलर मालमत्तेसह ते ३१व्या क्रमांकावर होते. यंदा त्यात तब्बल १२६.४ डॉलरची प्रचंड वाढ होऊन ही मालमत्ता १५१ अब्ज डॉलर झाली आहे.
भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे जागतिक अब्जाधीशांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. ८४.५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मालमत्तेसह त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे आपले स्थान परत मिळवले आहे.
‘अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत, यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत व त्यांची मालमत्ता ८४.५ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. गेल्या वर्षी आशियातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या जॅक मा यांना त्यांनी मागे टाकले आहे.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे ५०.५ अब्ज डॉलर मालमत्तेसह जागतिक यादीत २४व्या क्रमांकावर आहेत.
एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.
जागतिक यादीत ते ७१व्या क्रमांकावर असून, त्यांची मालमत्ता २३.५ डॉलर आहे.
पूनावाला समूहाचे अध्यक्ष आणि सीरम इन्स्ट्यिूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला १२.७ अब्ज अमेरिकी डॉलर मालमत्तेसह फोर्ब्ज च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत १६९व्या क्रमांकावर आहेत.
भारतीय अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे.
आंबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित
महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्राला ‘जैविक विविधता वारसा स्थळ’चा दर्जा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या महसुल व वन विभागाकडून हा दर्जा देण्याविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
ठळक बाबी
शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे.
शिस्टुरा हिरण्यकेशी हा एक रंगीबेरंगी लहान मासा आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात वाढतो. ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी घेतला.
वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे वारसाचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.
यापूर्वी राज्य सरकारने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे
गडचिरोली जिल्हा ‘मनरेगा’त राज्यात दुसरा
नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याने मात्र टाळेबंदीच्या काळातच सलग एक वर्ष ३४.५७ लाख मनुष्यदिन निर्मिती करत वर्षभरात १ लाख ९२ हजार ३४४ अकुशल कामगारांच्या हातांना काम दिले.
गडचिरोली जिल्हा मनरेगात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला. मनरेगाच्या या ‘गडचिरोली पॅटर्न’चे राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
२०२०-२१ या वर्षात जिल्ह््यात प्रत्यक्ष कार्यरत २ लाख ९३ हजार १०१ मजुरांपैकी १ लाख ९२ हजार ३४४ मजुरांच्या हातांना काम देण्यात आले.
मनरेगामध्ये ६०:४० अशी अकुशल व कुशल कामांची टक्केवारी ठरवलेली असते. त्यानुसार, ७५९४.२६ लाख रुपये अकुशल स्वरूपाच्या कामावर, तर १५२४.६७ लाख रुपये कुशल स्वरूपाच्या कामावर झाला. त्यानुसार हे प्रमाण (८४:१६) असे येते. सन २०२०-२०२१ करिता गडचिरोली जिल्ह््यात २४.५१ लाख मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२१ अखेरीस जिल्ह््याने ३४.५७ लाख मनुष्यदिन निर्मिती केली आहे.