Current Affairs 08 July 2020
अॅथलेटिक्स प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार
- वयोमर्यादेनुसार करारात मुदतवाढ देण्यास भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नकार दिल्यानंतर बहादूर सिंग हे तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाले.
- राष्ट्रीय सराव शिबिरातील प्रशिक्षकांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र १९७८ आणि १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते गोळाफेकपटू बहादूर सिंग यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपुष्टात आला. मात्र त्यांना करारात मुदतवाढ देण्यास भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) नकार दर्शवला. फेब्रुवारी १९९५पासून ते भारताचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक होते.
- बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत १२ पदके मिळवली. २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आठ सुवर्णपदकांसह एकूण २० पदके जिंकली होती.
देशात प्रथमच सौरऊर्जेवर चालणार रेल्वे
- सौरऊर्जेतून देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरील विजेची गरज पूर्ण केल्यानंतर रेल्वे लवकरच या विजेचा वापर रेल्वे गाडी चालवण्यासाठी करणार आहे.
- मध्य प्रदेशातील बीना येथे रेल्वेने आपल्या मोकळ्या जमिनीवर १.७ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. त्याला २५ केव्हीची ओव्हरहेड लाइनने जोडून रेल्वे चालवण्याची योजना आहे. पहिल्यांदा देशात सौरऊर्जेचा वापर करत रेल्वे चालवली जाईल.
- रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या चाचणीचे काम सुरू झाले आहे.
- पुढील १५ दिवसांत वीज उत्पादन सुरू होईल.
- प्रकल्पात डीसी प्रवाह एक फेज असलेल्या एसी प्रवाहात बदलण्यासाठी विशेष तंत्राचा वापर करण्यात आला आहे. यातून सरळ ओव्हरहेड लाइनला पुरवठा होईल.
- प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता २५ लाख युनिट असेल.
- रेल्वे छत्तीसगडमधील भिलाईतही आपल्या मोकळ्या जमिनीवर ५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहे. त्यालाही केंद्राच्या ‘ट्रान्समिशन यूटिलिटी’शी जोडले जाईल.