Current Affairs : 08 October 2020
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

रसायनशास्त्रातील संशोधनासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांना देण्यात येणार आहे. जीनोमवरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
इमॅन्यूअल शार्पेंची आणि जेनफिर डाउडना यांनी जीनोमच्या संपादनात महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीने म्हटले आहे. स्टॉकहोममध्ये ‘स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्स’च्या पॅनलने बुधवारी पुरस्कार विजेत्या शास्त्रांच्या नावाची घोषणा केली.
मागील वर्षी लिथियम-आयन बॅटरी विकसित करणारे शास्त्रज्ञ जॉन बी गुडइनफ, एम. स्टॅनली विटिंघम आणि अकिरा योशिनो यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांना एक सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (जवळपास ८ कोटी रुपये) दिले जातात.
अमेरिकेला हिसका देण्यासाठी चीन लाँच करतेय अंतराळ स्टेशन

अमेरिका आणि चीन या दोन देशात सातत्याने चढाओढ सुरु आहेच पण सायबर आणि इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात जणू युद्ध सराव सुरु झाला असल्याचे दिसून येत आहे. अंतराळ क्षेत्रात सुद्धा आत्ता ही स्पर्धा पोहोचली असून अमेरिकेला खुन्नस देण्यासाठी ड्रॅगन स्वतःचे अंतराळ स्टेशन उभारायच्या तयारीत आहे.
सीएमएसअ या चीनच्या अंतराळ संस्थेने गेल्या महिन्यात स्पेस स्टेशन ऑफ चायनाच्या पहिल्या मोड्युलला परवानगी दिली असून हे स्टेशन लवकरच लाँच करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. २०२१ मध्ये हे अंतराळ स्टेशन ३८० किमी अल्टीट्यूड वर स्थापित केले जात असल्याची बातमी चीनच्या ग्लोबल टाईम्सने दिली आहे. यासाठी १८ अंतराळ वीरांची निवड केली गेली आहे.
चीनचा हा निर्णय म्हणजे अंतराळात सुद्धा युध्द भूमी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा अमेरिकेने केला असून त्यांच्या पेंटागॉनने काही महिन्यापूर्वी अंतराळ युद्ध संबंधी धोरणे चीन कडून राबविली जात असल्याचा आरोप केला होता.
चीनच्या वायुसेनेचे मेजर जनरल कायो लियांग यांनी मीडियाशी बोलताना सांगितले अमेरिका चीनला शस्त्रास्त्र स्पर्धेत ओढून सोविएत प्रमाणे आम्हाला नेस्तनाबूद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण असे वाटणे ही त्यांची चूक आहे कारण जो नेस्तनाबूद होईल तो देश चीन नसेल.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या वॉशिंग्टन थिंक टँकने २०३० मध्ये चीन अंतराळ योजनात नंबर १ वर असेल असे मत व्यक्त केले होते आणि चीन त्यादिशेने वेगाने प्रवास करत आहे असे दिसून येत आहे
हा देश छापणार सर्वाधिक मुल्याची, एक लाखाची नोट

व्हेनेझुएला देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.
या देशाने १ लाख बॉलीवर (म्हणजे व्हेनेझुएलाचा रुपया) मुल्याची नोट छापण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी इटलीच्या बॅन कॅपीटल फर्मकडून ७१ टन सिक्युरिटी पेपरची आयात करण्यात आल्याचे समजते. ही फर्म अनेक देशांना सिक्युरिटी पेपर निर्यात करते. १ लाख बोलीवरची नोट ही जगात सर्वाधिक मुल्याची छापील नोट असेल असेही सांगितले जात आहे.
देशात राष्टपती कोण याचा खुलासा होऊ शकलेला नाही. २०१९ च्या सुरवातीला निकोलस मादुरो निवडणूक जिंकले होते पण त्यांनी मतदानात गडबड केल्याचे आरोप झाले. त्यामुळे मादुरो यांचे प्रतिस्पर्धी खुआन गोईडो यांनी स्वतःला राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे.