बाह्य़ग्रहाची वातावरणीय रचना उलगडण्यात यश
- पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे.
- अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे.
- ग्लिस ३४७० बी (जीजे ३४७० बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा कमी आहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर दुर्बीणीने शोधून काढले आहेत.
- खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे ३४७० बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे.
‘पहिला कृष्णवर्णीय आफ्रिकन अंतराळवीर’ होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्याला मृत्यूने गाठले
- दक्षिण आफ्रिकेतील अंतराळवीर मांडला मॅसेको यांचा दुचाकी अपघातात दूर्देवी मृत्यू झाला आहे. मांडला हे ३० वर्षांचे होते. अंतराळात जाणारा पहिला दक्षिण आफ्रिकन अंतराळवीर होण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
- अमेरिकेतील अंतराळ अकादमीने २०१३ साली आयोजित केलेल्या एका उपक्रमामध्ये मांडला यांची निवड करण्यात आली होती. अंतराळ प्रशिक्षणासाठी १० लाख जणांनी अर्ज केला होता. त्यामधून अकादमीने २३ जणांची निवड केली होती. ज्यामध्ये मांडला यांचा समावेश होता. अवकाशात झेपावणारा आफ्रिकेतील पहिला कृष्णवर्णीय (ब्लॅक आफ्रिकन) अंतराळवीर होण्याचे त्यांचे स्वप्न होतं.
- मांडला हे दक्षिण आफ्रिकेतील वायुदलाचे सदस्य होते. २०१३ साली त्यांची निवड झाल्यानंतर २०१५ मध्ये ते नासाच्या फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेंटरमध्ये अवकाश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या काही चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. सब ऑर्बिटल उड्डाणसाठी लागणारे काही तासांचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. हे अंतराळयान २०१५ साली अवकाशात झेपावणे अपेक्षित होते मात्र अंतिम क्षणी त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र प्रशिक्षणामध्ये त्यांनी १० हजार फुटांवरुन स्कायडाइव्ह करणे, व्हॉमीट कॉमेट अशा चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या होत्या.
‘तेजस एक्स्प्रेस’ ठरणार देशातली पहिली खासगी रेल्वे ?
- केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात विरोध असुनही अखेर रेल्वेच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकले आहे. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. रेल्वेने १०० दिवसांचे धोरण निश्चित करत सुरूवातीस दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पावलं उचलण्याचं नक्की केलं आहे. खासगी तत्त्वावर चालणारी पहिली रेल्वे ही दिल्लीहून लखनऊ या ठिकाणी जाणारी तेजस एक्स्प्रेस ठरणार आहे.
- दरम्यान तेजस एक्स्प्रेस ही देशातली पहिली खासगी रेल्वे ठरणार असून ती ताशी २०० किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. या ट्रेनला स्वयंचलित प्लग असलेले दरवाजे आहेत.
भारताचं घातक अस्त्र ‘नाग’, दिवसाच नाही आता अंधारातही उडवणार शत्रूचा रणगाडा
- नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या.
- नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची ५२४ कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे.
- दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्धवस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे. १९८० च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती. नाग त्यापैकी एक आहे. अग्नि, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्र सुद्धा याच कार्यक्रमातंर्गत विकसित करण्यात आली आहेत.
राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख
- टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. आयसीसीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
- १९ वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.
- भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडू हे वैद्यकीय सल्ल्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये येत असतात. इथे प्रशिक्षित डॉक्टर आणि फिजीओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी होती. या सर्व प्रक्रियेवर राहुल द्रविडची नजर असणार आहे. यासंदर्भात भारतीय संघ व्यवस्थापनाला द्रविड आपला अहवाल सोपवणार आहे.