अयोध्या वादात मध्यस्थ नियुक्त
- राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली.
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश आहे.
- विशेष म्हणजे हे तिघेही अयोध्या वादाच्या ‘प्रभावक्षेत्रा’बाहेरील तमिळनाडूचे आहेत.
- सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, या तीन सदस्यांना आणखी कुणाची गरज वाटली तर त्यांनाही या पथकात समाविष्ट करण्यात येईल. घटनापीठात न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. ए. नझीर यांचा समावेश आहे.
- २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर १४ अपिले सर्वोच्च न्यायालयात दाखल असून २०१० मधील निकालात न्यायालयाने अयोध्येतील २.७७ एकर जागा सुन्नी वक्फ मंडळ, निर्मोही आखाडा, राम लल्ला यांच्यात सारखी वाटून देण्याचा आदेश दिला होता.
मुंबई ठरले जगातील १२ वे सर्वाधिक श्रीमंत शहर
- नाईट फ्रंट या संस्थेत जारी केलेल्या जागतिक पातळीवरील संपत्तीविषयक अहवालानुसार मुंबई शहर जगातील १२ व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे. २०१७ च्या अहवालात मुंबई १८ व्या स्थानी होती. ब्रेक्झिटच्या चिंता दूर सारून लंडन शहर पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत शहर ठरले आहे. आधी हे स्थान न्यूयॉर्ककडे होते.
- अब्जाधीशांची संख्या वाढण्याच्या बाबतीत भारत ११६ टक्के वृद्धीसह जगात अव्वलस्थानी आहे. २०१३ मध्ये भारतात फक्त ५५ अब्जाधीश होते. २०१८ मध्ये ही संख्या ११९ झाली आहे. आशियातील अब्जाधीशांच्या संख्येत २७ टक्के वाढ झाली आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपला आशियाने मागे टाकले आहे.
- मुंबईत भारतातील सर्वाधिक लक्षाधीश आणि अतिश्रीमंत लक्षाधीश राहतात. अब्जाधीशांच्या बाबतीत मात्र बंगळुरू आघाडीवर असल्याचे दिसते. भारतात १,९४७ अतिश्रीमंत लक्षाधीश आहेत. त्यातील ७९७ जण मुंबईत, २११ जण दिल्लीत आणि ९८ जण बंगळुरूत आहेत. भारतात ११९ अब्जाधीश असून, बंगळुरूत ३३, मुंबईत १९ आणि दिल्लीत ८ अब्जाधीश आहेत.
पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिलेकडे सभागृहाचे अध्यक्षपद
- पाकिस्तान संसद सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाली आहे. कृष्णा कुमारी कोहली उर्फ किशू बाई असे त्यांचे नाव आहे.
- पाकिस्तानमधील श्रमिकांच्या अधिकारांसाठी कृष्णा कुमारी कोहली यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर २०१८ मध्ये त्या संसदेवर निवडून आल्या. पाकिस्तान संसदेमध्ये निवडून येणाऱ्या कृष्णा पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत.
- कृष्णा कुमारी या सिंध प्रांतातील थार येथील सुदूर नगरपारकर जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. ३९ वर्षीय कृष्णा कुमारी यांचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं होतं.
नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धा : मुंबईच्या कुश भगतला कांस्यपदक
- नऊ वर्षांचा कँडिडेट मास्टर कुश भगत याने पॅरिस येथे रंगलेल्या खुल्या गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याची किमया साधली.
- १४०० ते २००० एलो रेटिंग गुण असलेल्या बुद्धिबळपटूंना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला होता. जवळपास १२ देशांतील बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
- १८वे मानांकन मिळालेल्या कुशने दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित फावरे मॅथ्यू याच्यावर मात करत सर्वानाच धक्का दिला होता. त्यानंतर तिसऱ्या फेरीत त्याने तौरे शांथी याला हरवले होते. भगतने या स्पर्धेद्वारे ११८ एलो गुणांची कमाई करत आपली रेटिंग संख्या १८०० वर नेली.