मुंबई महापालिकेचे इक्बाल चहल नवे आयुक्त
राज्यातील ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे.
प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत.
प्रवीण परदेशी यांच्यासह मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आबासाहेब जऱ्हाड यांची आता मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रवीण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते.
नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धात आनंदच्या विजयामुळे भारत पाचव्या स्थानी
माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नेशन्स चषक सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली.
परंतु तिसऱ्या दिवसाच्या पाचव्या फेरीत रशियाने बरोबरीत रोखले. मग सहाव्या फेरीत अमेरिकेने भारताला 2.5-1.5 अशा फरकाने नामोहरम केले असले तरी भारताला पाचवे स्थान गाठता आले आहे.
तर पाचव्या फेरीत 50 वर्षीय आनंदने रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोमनियाचशीला फक्त 17 चालींत पराभूत केले.
मग बी. अधिबान आणि द्रोणावल्ली हरिका यांनी अनुक्रमे सर्जी कर्जकिन आणि ओल्गा गिर्या यांना बरोबरीत रोखले.
परंतु व्लादिस्लाव्ह आर्टेमीव्हने पी. हरिकृष्णाला पराभूत केल्यामुळे रशियाला सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधता आली.
सीकेपी बँकेचा परवाना रद्द
शतकभराचा वारसा लाभलेल्या सीकेपी सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना अखेर रद्दबातल करणारा आदेश रिझव्र्ह बँकेने काढला. एप्रिल २०१४ पासून ठेवी स्वीकारण्याला आणि बँकेच्या नवीन कर्ज वितरणावर रिझव्र्ह बँकेने निर्बंध आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचा एक गट बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील होता. बँकेच्या फेरउभारीसाठी सरकारने मदत करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ठेवीदारांकडून याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. बँकेला परवानगी मिळाली. हे निर्वाचित संचालक मंडळ दोन महिन्यांपूर्वीपर्यंत बँकेचा कारभार पाहत होते.
स्टेट बँकेच्या कर्ज व्याजदरात कपात
स्टेट बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर देऊ करतानाच ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.
देशातील सर्वाधिक कर्जवाटप असलेल्या स्टेट बँकेने ‘मार्जीनल कॉस्ट ऑफ फंड्स’ आधारित कर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्कय़ाची कपात केली आहे. मागील काही दिवसात स्टेट बँक व्याजदरात सातत्याने कपात करीत असून ही १२वी कपात असल्याचे स्टेट बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना काळात भारतात २ कोटींहून अधिक मुलांचा जन्म
कोरोनाच्या जागतिक साथरोगाचे थैमान सुरू असतानाच पुढील दहा महिन्यात भारतात दोन कोटीहून अधिक मुलांचा जन्म होईल, असे युनिसेफच्या वतीने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. जगात कोरोनाच्या सावटात ११.६ कोटी मुलांचा जन्म होईल. कोरोनाला ११ मार्च रोजी जागतिक साथरोग म्हणून घोषित करण्यात आले. मुलांच्या जन्मदरांची ही आकडेवारी ४० आठवड्यापर्यंतची आहे. भारतात येत्या ११ मार्च ते १६ डिसेंबरपर्यंत दोन कोटींहून अधिक मुले जन्माला येतील.