चालू घडामोडी : ०९ ऑक्टोंबर २०२०
Current Affairs : 09 October 2020
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल जाहीर
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना २०२० चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करुन देते असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे.
कवयित्री लुईस ग्लक यांनी १९६८ मध्ये ‘फर्स्टबोर्न’ सोबत आपल्या कविता लेकनाला सुरुवात केली होती. त्यानंतर अल्पावधितच त्यांचा अमेरिकेतील समकालीन साहित्यविश्वात प्रमुख कवींमध्ये समावेश झाला.
त्यांनी बारा कवितांचा संग्रह आणि काही निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहांपैकी ‘द वाइल्ड आयरिस’ हा काव्यसंग्रह सन १९९२ मध्ये प्रकाशित झाला होता. या काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलं आहे.
२०१९ मध्ये पीटर हँडका यांना मिळाला होता साहित्यातला नोबेल
सन २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हँडका यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. उत्कृष्ट लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोगांबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
फोर्ब्सची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर
फोर्ब्सने सन २०२०ची १०० सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग १३व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
मुकेश अंबानींकडे ८८.७ अब्ज डॉलर संपत्ती आहे.
अंबानी यांच्यानंतर आहेत हे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती
मुकेश अंबानी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी आहेत. अदाणींची एकूण संपत्ती २५.२ अब्ज डॉलर आहे.
तिसरे स्थान एचसीएल टेक्नॉलॉजिजचे अध्यक्ष शीव नाडर यांनी पटकावले आहे. नाडर यांची संपत्ती २०.४ अब्ज डॉलर आहे.
तर चौथ्या क्रमांकावर डी मार्टचे मालक राधाकिशन दमानी हे आहेत. ते १५.४ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.
पाचव्या क्रमांकावर हिंदुदजा ब्रदर्सच्या नावाचा समावेश आहे. हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती १२.८ अब्ज डॉलर आहे.
सहाव्या क्रमांकावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती ११.५ अब्ज डॉलर इतकी आहे.
सातव्या स्थानी पालोनजी मिस्त्री हे आहेत, त्यांची संपत्ती ११.४ अब्ज डॉलर आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक हे आठव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ११.३ अब्ज डॉलर आहे.
तर नववे स्थान गोदरेज कुटुंबाला मिळाले आहे. त्यांची संपत्ती ११ अब्ज डॉलर आहे.
तसेच दहाव्या क्रमांकावर स्टील उत्पादक कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांचा समावेश आहे. त्यांची संपत्ती १०.३ अब्ज डॉलर आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे (गुरुवार) निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते.
अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील.
राजकारणाची नस पकडलेले रामविलास पासवान पहिल्यांदा १९६९मध्ये आरक्षित मतदारसंघातून संयुक्त सोशलिस्ट पार्टीकडून बिहारच्या विधानसभेत पोहोचले होते.