1) भारतीय लष्कराला मिळणार अत्याधुनिक बुलेट प्रूफ जॅकेट
भारतीय लष्कराची बुलेट प्रूफ जॅकेटची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल 9 वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयानं सोमवारी (9 एप्रिल) मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटी रुपयांचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत. एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेज या कंपनीला हा करार मिळाला आहे. भारतीय लष्कराची बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केंद्र सरकारने 2009 मध्येही मान्य केली होती. मात्र त्यावेळी लष्कराने आयोजित केलेल्या ट्रायलमध्ये एकही कंपनी टिकू शकली नव्हती. सहभागी झालेल्या चारपैकी फक्त एका कंपनीने पहिला राऊंड पार केला होता. दरम्यान करारासंदर्भात सांगताना मंत्रालयानं सांगितले की, 1,86,138 बुलेटप्रूफ जॅकेट्ससाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. नवीन बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना ‘360 डिग्री सुरक्षा’ पुरवतील असा दावाही करण्यात आला आहे. या जॅकेटमध्ये सुरक्षेसंबंधी सर्वोत्कृष्ट सुविधा पुरवल्या जातील, असं एसएमपीपी कंपनीने सांगितले आहे.
2) अंतराळातील हॉटेल ‘आॅरोरा स्टेशन’
चार वर्षांनंतर चक्क अंतराळातील पहिल्यावहिल्या हॉटेलमध्ये ‘सुट्टीचा काळ मजेचा’ घालविता येणार आहे. या लक्झरी हॉटेलचे नाव आहे ‘आॅरोरा स्टेशन’ असून ते अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीतील ओरायन स्पॅन या कंपनीतर्फे सुरू केले जाईल. अंतराळातील हॉटेलची संकल्पना आहे फारच रम्य पण त्याचे दर भरमसाठ आहेत. जगातील सर्वात महागडी हॉटेल रूम जिनिव्हातील हॉटेल प्रेसिडेंट विल्सनमध्ये आहे. इथे एक रात्र राहायचे असेल तर ८० हजार डॉलर म्हणजे ५३ लाख रुपये मोजावे लागतात. आॅरोरा स्टेशन या अंतराळातील हॉटेलची तर सारी बातच न्यारी आहे. हे हॉटेल पृथ्वीपासून अंतराळात २०० मैैल उंचीवर असणार आहे. त्यातील एका रूमच्या नुसत्या बुकिंगसाठी ८० हजार डॉलर मोजावे लागतील. आॅरोरा स्टेशन हॉटेलमध्ये एखाद्या व्यक्तीला १२ दिवस राहायचे असेल, तर मोजावे लागतील ९.५ दशलक्ष डॉलर म्हणजे ६१.६ कोटी रुपये. त्यामुळे सध्या तरी गर्भश्रीमंतांच्याच आवाक्यातले हे प्रकरण आहे. ‘सेव्हन डेज सेवन नाइट्स’च्या टूरचा बेत आखून पर्यटनाला निघणाऱ्या मध्यमवर्गीय माणसासाठी आॅरोरा स्टेशनमध्ये राहाणे हे या घडीला तरी स्वप्नवतच आहे.
3) जुलैमध्ये सूर्यावर पहिली स्वारी
माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान ३१ जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरिडा येथे नेण्यात आले असून तिथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात येत आहेत. डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल. ते सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे. आजवर तिथपर्यंत मानवनिर्मित एकही गोष्ट पोहोचू शकलेली नाही. सूर्यातून होणारा किरणोत्सार, तसेच प्रचंड तप्त वातावरण याचा सामना करत पार्कर सोलार प्रोबला आपले शोधकार्य पार पाडावे लागणार आहे. सौरवायू, तसेच ग्रहमालेतील व पृथ्वीजवळील हवामानावर परिणाम करणारे सूर्याच्या पृष्ठभागावरील घटक यांचा अभ्यास या मोहिमेत करण्यात येईल. पार्कर सोलार प्रोब अंतराळयानाला थर्मल प्रोटेक्शन सीस्टिम किंवा हिट शिल्ड बसविण्याचेही काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. सूर्यावर प्रचंड उष्णता असून, त्यापासून हिट शिल्ड या अंतराळयानाचे संरक्षण करेल. या मोहिमेचा कालावधी सात वर्षांचा आहे.
4) पोस्ट ऑफिस खाती डिजिटल होणार
देशातील जवळपास 34 कोटी पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना मे महिन्यापासून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळणार आहेत. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमधील बचत खाती इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेला (आयपीपीबी) लिंक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्वांना डिजिटल बँकिंग सुविधेचा लाभ घेता येईल.
पोस्ट आॅफिस ६५० आयपीपीबी शाखांचे काम सुरू करण्याचा विचार करत आहे. या सर्व ६५० शाखा जिल्ह्यातील छोट्या पोस्ट कार्यालयांना जोडलेल्या असतील. आयपीपीबी शाखा पोस्टाच्या नेटवर्कशी जोडल्या जातील. एकूण १.५५ लाख पोस्ट आॅफिस आहेत. यातील १.३ लाख शाखा ग्रामीण भागातील आहेत. १.५५ लाख शाखांसह पोस्ट हे भारतातील सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क बनत आहे. दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरपासून खातेधारक सुकन्या समृद्धी योजना, ठेवी, स्पीड पोस्ट, यासाठी आयपीपीबी खात्यातून पैसे डिपॉझिट करू शकतील.
आयपीपीबीचा ग्राहक एनईएफटी, आरटीजीएस आणि अन्य मनी ट्रान्सफर सेवेचा उपयोग करू शकतात. एकदा पोस्ट आॅफिस सेव्हिंग बँक खाते (पीओएसबी) आयपीपीबीशी लिंक केले की, खातेदार अन्य बँकांसोबत मनी ट्रान्सफरची सेवा घेऊ शकतो. खातेधारकांनी ही सेवा निवडली, तर त्यांचे खाते आयपीपीबीशी जोडले जाईल.
5) रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र
रायगड किल्ल्याचे संवर्धन व विकासाबद्दल पंतप्रधान कार्यालयात सोमवारी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये भारतीय पुरातत्व खात्याच्या मर्यादित क्षमता पाहता रायगड किल्ल्याच्या विकासाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त प्रयत्नांनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये याबाबतचा सामंजस्य करार लवकरच होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिली. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा व भारतीय पुरातत्व खात्याच्या महानिर्देशक उषा शर्मा आणि केंद्र सरकार व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.