Current Affairs 10 April 2020
ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य
देशभरात करोनामुळे अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेणारं ओडिशा हे देशातील पहिलं राज्य आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही असाच निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे. ३० एप्रिलपर्यंत ओडिशामध्ये लॉकडाउन लागू असणार आहे.
ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी झाले स्वच्छ
करोनाची साथ देशभरात पसरली आहे. संपूर्ण जग या करोनाचा सामना करतं आहे. अशात काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहेत. आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी स्वच्छ झालं आहे. याआधी गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, पंचगंगा या नद्यांचंही पाणी स्वच्छ झालं आहे. या यादीत आता ब्रह्मपुत्रा नदीचीही भर पडली आहे.
ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे अश्रू म्हणतात हे वाक्य भूगोलाच्या पुस्तकात वाचलं आहे. कारण या नदीला पूर आला तर आसाम जलमय होतो. पण याच नदीत इंडस्ट्रीयल एरियाचं प्रदुषित पाणीही सोडलं जातं. मात्र लॉकडाउनमुळे या कंपन्याच बंद आहेत त्यामुळे नदीच्या पाण्याचा स्तर सुधारला आहे.
भारताचे संशोधक करोनावर शोधणार लस, ऑस्ट्रेलियाशी केला करार
कोरोना विषाणू (कोविड-19)वर लस शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केल्याची घोषणा इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) या आघाडीच्या लस उत्पादक कंपनीने केली आहे.
भारतात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत कराराच्या माध्यमातून सहयोग साधला आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक लस शोधून काढण्यासाठी या सहयोगातून प्रचंड प्रमाणावर संशोधन हाती घेतले जाणार आहे.
या दोन खंडांमधील या लक्षणीय सहकार्यामुळे आयआयएल आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया)मधील वैज्ञानिक कोडोन डी-ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ‘लाइव्ह अटेन्युएटेड सार्स – सीओव्ही-2 लस’ किंवा कोविड-19 लसीचा शोध लावणार आहेत. अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह हे रोगप्रतिबंधक, सक्रिय, सिंगल डोस प्रतिकारात्मक औषध मानवी शरीरात कोरोना विषाणूंशी लढण्यासाठीची लस तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान आश्वासक आहे. या लसीमुळे एकाच डोसमधून दीर्घकाळ सुरक्षितता आणि इतर अधिकृत सक्रिय रोगप्रतिकारक लसींप्रमाणे लाभ मिळणे अपेक्षित आहे.
संशोधन पूर्ण झाल्यानंतर या लसीचे अंश इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला हस्तांतरित केले जातील आणि लस बनवणाऱ्या कंपन्या देशातील सीडीएससीओ (द सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन)च्या नियमनानुसार टप्प्याटप्प्याने पुढील क्लिनिकल चाचण्या घेतील.
पुजाराचा ग्लुस्टरशायरशी करार रद्द
भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमधील ग्लुस्टरशायर संघासोबतचा कौंटी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सहा सामन्यांसाठीचा करार करोनामुळे रद्द करण्यात आला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) त्यांच्या देशातील सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट २८ मेपर्यंत रद्द केले आहे.