देश-विदेश
भारताच्या पहिल्या महिला नौसेना कॅप्टन राधिका मेनन यांना शौर्य पुरस्कार
# भारतीय व्यापारी नौसेनेच्या पहिल्या महिला कॅप्टन राधिका मेनन यांना सागरी शौर्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सरकारने रविवारी मेनन यांना आयएमओकडून पुरस्कार मिळणार असल्याची माहिती दिली. मागील वर्षी जूनमध्ये राधिका मेनन यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुर्गाम्मा या बुडत्या जहाजासह सात मच्छीमारांना वाचविले होते. या जहाजातील मच्छीमारांचे अन्न समुद्राच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यानंतर हे मच्छीमार बर्फावर जिवंत राहिले होते. १५ ते ५० वयोगटातील या मच्छीमारांना वाचविण्यासाठी तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढल्याच्या पराक्रमाबद्दल राधिका मेनन यांना २०१६ मधील विशेष शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय समुद्र संघटनेच्यावतीने (आयएमओ) हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार पटकाविणाऱ्या राधिका मेनन या जगातील पहिल्या महिला आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्र संघटना (आयएमओ) ही संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमानाने जहाज सुरक्षा आणि जहाजांद्वावारे समुद्रात होणाऱ्या प्रदुषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असते. त्यामुळे अशा संस्थेकडून भारतीय महिलेला मिळणारा हा सन्मान कौतुकास पात्र आहे. महिला जगात आपला ठसा उमटविण्यात सक्षम असल्याचे राधिका मेनन यांच्या शौर्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
भारतीयांना एच -१ बी, एल- १ व्हिसा देण्याविरोधात विधेयक
# अमेरिकी कंपन्यांनी एच १ बी व एल १ व्हिसावर भारतीय कंपन्यांकडून पाठवल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊ नये यासाठी अमेरिकी प्रतिनिधिगृहात एक विधेयक सादर करण्यात आले आहे. संमत झाले तर भारतीय आयटी कंपन्यांना आपले कर्मचारी तिकडे पाठवण्याचे मार्ग बंद होणार आहेत. एच १ बी व एल १ व्हिसा सुधारणा कायदा २०१६ विधेयक न्यूजर्सीचे डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य बिल पासक्रेल व रिपब्लिकन पक्षाच्या कॅलिफोर्नियातील सदस्य डॅना रोहराबँचर यांनी मांडले आहे. त्यानुसार पन्नास कर्मचारी किंवा एकूण कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भारतातून घेतले जाणार असतील, तर एच १ बी व एल १ हे दोन्ही व्हिसा त्यांना देण्यात येऊ नयेत. अनेक भारतीय आयटी कंपन्यांचे महसुली प्रारूप हे एच १ बी व एल १ व्हिसावर अवलंबून आहे. त्यामुळे या विधेयकाचा फटका भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाला बसणार आहे. जास्तीत जास्त अमेरिकी भारतीय असलेल्या भागातील दोन सदस्यांनी हे विधेयक मांडले आहे, हे विशेष आहे.
उत्तर कोरियात पाणबुडीवरून क्षेपणास्त्र चाचणी
# उत्तर कोरियाने पाणबुडीवरून आंतरखंडीय क्षेपणास्त्र उडवून आज चाचणी केल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. अमेरिका व कोरिया यांनी दक्षिणेला प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली उभारण्याचे जाहीर करताच उत्तर कोरियाने शनिवारी ही चाचणी केली आहे. चीननेही काल क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा बसवण्याच्या विरोधात अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या राजदूतांना बोलावून नापसंती व्यक्त केली होती. उत्तर कोरियाने एसएलबीएम क्षेपणास्त्र ईशान्येकडील सिनपो बंदरावरून सकाळी साडेअकरा वाजता सोडले, असे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. उत्तर कोरियाने याआधी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी २३ एप्रिलला केली होती व हे सर्वाचे डोळे उघडणारे यश आहे अशी दर्पोक्तीही केली होती. दक्षिण कोरिया व अमेरिकेवर हल्ला करण्याची आमची क्षमता आहे, असे त्या उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी सांगितले.
महाराष्ट्र
फडणवीस सरकारचे नवे खाते वाटप जाहीर
# राज्य मत्रिमंडळाचे नवे खाते वाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. फडणवीस सरकारच्या खाते वाटपामध्ये चंद्रकांत पाटील आणि गरीश महाजन यांच्याकडे मह्त्वाची खाती देण्यात आली आहेत. तर विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे. पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधार खाते तर विनोद तावडे यांच्या कडील वैद्यकीय शिक्षण खाते काढून घेण्यात आले आहे. फडणवीस सरकारची खातेवाटप पुढील प्रमाणे- चंद्राकांत पाटील – महसूलमंत्री, गिरीश महाजन – वैद्यकीय शिक्षण मंत्री, पांडुरंग फुंडकर – कृषीमंत्री, राम शिंदे – जलसंधारणमंत्री, चंद्रशेख बावनकुळे – ऊर्जा, उत्पादन शुल्कमंत्री, सुभाष देशमुख- वस्त्रोद्योग, पणन, सहकारमंत्री, गुलाबराव पाटील – सहकार राज्यमंत्री, रविंद्र चव्हाण – बंदरे, आरोग्यमंत्री राज्यमंत्री, महादेव जानकर – पशु दुग्ध विकासमंत्री (कॅबिनेट) ,अर्जुन खोतकर – पशुदुग्ध राज्यमंत्री ,संभाजी निलंगेकर – कामगार, कौशल्यविकासमंत्री.
क्रीडा
भारताची हॉकी कर्णधार रितू राणीची ऑलिम्पिक संघातून हकालपट्टी
# हॉकी कर्णधार रितू राणीची रिओ ऑलिम्पिकला जाणाऱ्या भारतीय संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. खराब कामगिरी आणि वृत्तीच्या समस्येमुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत ऑलिम्पिकसाठी भारताच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा होणार आहे. मात्र बंगळुरू येथे चालू असलेल्या राष्ट्रीय शिबिरातून रितू निघून गेल्याचे संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ सदस्यांनी सांगितले.
स्टेफीच्या सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जेतेपदाशी सेरेनाची बरोबरी
# अनुभव हाच गुरू असतो याचा प्रत्यय घडवत सेरेना विल्यम्सने जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. हा सामना ७-५, ६-३ असा जिंकून सेरेनाने या स्पर्धेतील एकेरीत सातव्यांदा विजेतेपद पटकाविले. महिला एकेरीत सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या स्टेफी ग्राफच्या विक्रमाशीही बरोबरी करत सेरेनाने इतिहास घडवला.