चालू घडामोडी – १० जून २०१६
देश-विदेश
अध्यक्षीय उमेदवारीसाठी ओबामांचा क्लिंटन यांना पाठिंबा
# अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीसाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आतापर्यंत जनमत चाचण्यात क्लिंटन यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेल्या त्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ओबामा यांनी माजी परराष्ट्रमंत्री क्लिंटन यांना पाठिंबा दिल्याचे त्यांच्या प्रचार समितीने सांगितले.
एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला मेक्सिकोचाही पाठिंबा जाहीर
# आण्विक पुरवठादार गटाचा (एनएसजी) सदस्य होण्यासाठी भारताला मेक्सिकोचाही पाठिंबा मिळाला आहे. ४८ सदस्यांच्या एनएसजीच्या व्हिएन्नात होणाऱ्या बैठकीच्या तोंडावर स्वित्र्झलड व अमेरिकेच्या पाठोपाठ मिळालेला हा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या व्यापक चर्चेनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएटो यांनी एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताला आपल्या देशाचा पाठिंबा जाहीर केला. व्यापार व गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा व अंतराळ विज्ञान यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून दोन्ही नेत्यांनी ही चर्चा केली.
भारतीय लेखक अखिल शर्मा यांना युरो पुरस्कार
# भारतीय अमेरिकी लेखक अखिल शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला असून, एक लाख युरो, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयर्लंडकडून हा पुरस्कार दिला जातो. कादंबरीसाठी दिला जाणारा हा जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे. दिल्लीत जन्मलेले शर्मा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत. तसेच त्यांना त्यांच्या आत्मकथेसाठी 2015 मध्ये 40 हजार पौंडांचा फोलियो पुरस्कार मिळाला होता. डब्लिन पुरस्कारासाठी 160 नामांकने आली होती. त्यातून शर्मा यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली. ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिण्यासाठी शर्मा यांना 13 वर्षे लागली.
भारत व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रप्रणाली देणार
# भारत व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ ही अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्रप्रणाली विकणार आहे. शस्त्रास्त्र आयातीमध्ये जगात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या भारताने आता शस्त्रास्त्र निर्यातीकडे लक्ष पुरविण्यास सुरवात केली आहे. व्हिएतनामसह आणखी पंधरा देशांना ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे निर्यात करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याच्या दृष्टीनेही भारताने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ निर्यात करण्याच्या निर्णयाकडे या नजरेतूनही पाहिले जात आहे. भारत व रशियाच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच रशियाकडे ‘ब्राह्मोस’ एरोस्पेसची मागणी केली आहे. तसेच या एरोस्पेसमधूनच क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते.
अत्याधुनिक क्षेपणास्त्र
ध्वनीच्या तिप्पट वेगवान असलेली ब्राह्मोस ही क्षेपणास्त्रप्रणाली सध्या जगातील सर्वांत अत्याधुनिक मानली जाते. 290 किलोमीटर मारा करण्याची क्षमता असलेले ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र जमीन व समुद्र तसेच पाणबुडीवरून डागता येते. हवेतून मारा करण्याबाबत सध्या ‘ब्राह्मोस’च्या चाचण्या सुरू आहेत.
भारताला मेक्सिकोचा विधायक पाठिंबा
# आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोने (दि.9) पाठिंबा दिला. 48 देश सदस्य असलेल्या एनएसजीचे खुले अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. तसेच या गटातील सदस्य देश आपापसांत अणू तंत्रज्ञानाचा व्यापार व निर्यात करू शकतात. मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएतो यांनी एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोचा सकारात्मक आणि विधायक पाठिंबा असल्याचे निएतो यांनी मोदी यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र
नगरपालिकांची ऑनलाइन सेवा उपलब्ध होणार
# राज्य सरकारच्या विविध विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जोडण्यात येणार असून, येत्या 2 ऑक्टोबरपासून नगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाइन देण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक (दि.8) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. फडणवीस म्हणाले, की राज्यात नगरपालिकेतर्फे देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने 2 ऑक्टोबरपासून ऑनलाइन देण्याची कार्यवाही सुरू करावी, तसेच वैद्यकीय विभागातील सेवा एकाच ठिकाणाहून देता याव्यात यासाठी ‘क्लाऊड बेस सिस्टिम’चा उपयोग करावा. सर्व योजनांतील वैयक्तिक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक घेऊन त्याची पडताळणी ई-केवायसी पद्धतीने करण्यात यावी. शिधावाटप करण्यासाठी आधार प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक पद्धती तातडीने संपूर्ण राज्यात राबवावी, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील काळात आधार कार्ड नोंदणी ही सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबवावी. रुग्णालये, शाळा व अंगणवाडी येथे नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. यासाठी अंगणवाडी परीक्षकांना टॅबलेट देण्यात यावेत. तसेच सहा महिन्यांतून एकदा अंगणवाडीच्या ठिकाणी आधार नोंदणी शिबिर घेण्यात यावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
क्रीडा
ऑलिम्पिकसाठी बिंद्रा ध्वजवाहक
# ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या ५ ऑगस्टला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असणार आहे, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) या वृत्तास दुजोरा दिला आहे. बिंद्राने २००८मध्ये बीजिंग येथे सुवर्णपदक पटकावले होते. तो पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहे. ध्वज नेण्यासाठी बिंद्रा याच्याबरोबरच व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग, टेनिस कांस्यपदक विजेता लिएण्डर पेस, रौप्य व कांस्यपदक विजेता मल्ल सुशील कुमार यांच्याही नावाचा विचार झाला होता. मात्र ऑलिम्पिकमधील वैयक्तिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा बिंद्रा हा एकमेव खेळाडू असल्यामुळे त्याच्या नावाला प्राधान्य देण्यात आले.
तमिळनाडूमध्ये ‘टीएनपीएल’ क्रिकेट स्पर्धा आयोजित
# ‘इंडियन प्रीमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता तमिळनाडूमध्येही तमिळनाडू प्रीमियर लिग (टीएनपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीएनपीएल आयोजित करण्यात येणार आहे. तसेच या मागे (टीएनपीएल) दोन उद्देश आहेत. एक म्हणजे तमिळनाडूमधील खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यामुळे आयपीएल किंवा इतर कोणतीही टीम त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकेल आणि त्यांचे भविष्य घडेल. दुसरे म्हणजे क्रिकेट हा केवळ शहरातील खेळ असून चेन्नईपुरताच मर्यादित असल्याचे समज दूर होऊन तमिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यांत क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल. अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सदस्य एन. श्रीनिवासन यांनी दिली.