हिमंत बिस्व सरमा होणार आसामचेे नवे मुख्यमंत्री
आसामच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे नेते आणि पूर्वोत्तर लोकशाही आघाडीचे (एनईडीए) संयोजक हिमंत बिस्व सरमा यांची निवड करण्यात आली आहे.
सरमा यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने 15 मे 2001 पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. 1996 ते 2005 पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिलं आहे.
विज्ञान शाखेचे विद्यार्थी असतानाही त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता.
कॉटन कॉलेजमध्ये 1991-92मध्ये ते कॉलेजचे जनरल सेक्रेटरी होते. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली.
1996मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर 2001मध्ये त्यांनी जालुकबरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’वर नेमणूक
हॉलीवूडमधील अभिनेते अॅश्टन कुचर व मिला कुनिस यांच्यासह २०२० सालचे ग्लोबर टीचर पुरस्कार विजेते व भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडमी’ वर नेमणूक करण्यात आली आहे.
डिसले यांनी गेल्या वर्षीच्या अखेरीस १ अब्ज अमेरिकी डॉलरचा हा पुरस्कार जिंकला होता.
याच पुरस्काराशी साधम्र्य साधणाऱ्या ५० हजार अमेरिकी डॉलरच्या पुरस्काराच्या निवड समितीवर आता त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
चेग या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीच्या ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या ‘चेग डॉट ओआरजी’च्या सोबतीने वार्के फाऊंडेशनने हा पुरस्कार सुरू केला आहे.
अध्ययनावर, तसेच एकूण समाजावर आपला ठसा उमटवणाऱ्या असामान्य विद्यार्थ्यांचे प्रयत्न जगापुढे आणण्यासाठी नवे व्यासपीठ म्हणून ‘ग्लोबल स्टुडंट प्राइझ’ सुरू करण्यात आले आहे.
अभिनेते अॅश्टन कुचर व मिला कुनिस, अमेरिकेतील महिलांच्या राष्ट्रीय चमूतील खेळाडू जुली एर्ट्झ व त्यांचे पती झाक एर्ट्झ हे ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकादमीचे इतर सदस्य आहेत.
माद्रिद खुली टेनिस स्पर्धा : सबालेंका अजिंक्य
बेलारुसच्या पाचव्या मानांकित आर्यना सबालेंकाने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अॅश्ले बार्टीला नमवून महिला एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
दोन आठवडय़ांपूर्वी स्नायूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करणाऱ्या सबालेंकाने दमदार खेळ करताना मातीच्या कोर्टवरील पहिले जेतेपद मिळवले.
तिने बार्टीला ६-०, ३-६, ६-४ असे तीन सेटमध्ये पराभूत केले.
सबालेकांचे हे कारकीर्दीतील एकूण १० वे जेतेपद ठरले.
२३ वर्षीय सबालेंका जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणार आहे.
सलग नवव्यांदा बायर्न म्युनिच बुंदेसलिगामध्ये चॅम्पियन
जर्मनीच्या बायर्न म्युनिच फुटबॉल क्लबने देशांतर्गत लीग बुंदेसलिगाचा किताब पटकावला.
जर्मनीचा हा क्लब या किताबाचा सलग नवव्यांदा मानकरी ठरला अाहे. याशिवाय बायर्न म्युनिच क्लबने करिअरमध्ये ३० वेळा या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याची विक्रमी कामगिरी नोंदवली अाहे.
बायर्न म्युनिचने सत्रातील अापल्या ३२ व्या सामन्यात बाेरुसिया माेनचेनग्लेडबेकवर मात केली. या क्लबने ६-० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला.