इस्त्रायलमध्ये पुन्हा नेतान्याहू सरकार
- इस्त्रायलमध्ये पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू यांचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. इस्त्रायलच्या राष्ट्रीय निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी विजय मिळवला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधानपद भूषवण्याची त्यांची ही विक्रमी पाचवी वेळ असेल.
- आतापर्यंत ९७ टक्के मतांची मोजणी झाली असून कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पण नेतान्याहू मजबूत स्थितीत असून त्यांना पाठिंबा देणाऱ्या अन्य पक्षांची मोट बांधून ते सरकार स्थापन करु शकतात.
- बेंजामिन नेतान्याहू यांच्या लीकुड आणि विरोधात असलेल्या गांटेझ यांच्या सेंट्रीस्ट ब्ल्यू पक्षाला समसमान ३५ जागा मिळाल्या आहेत पण नेतान्याहू अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवण्याच्या स्थितीमध्ये आहेत. बेंजामिन नेतान्याहू हे इस्त्रायलच्या ७१ वर्षाच्या इतिहासातील इस्त्रायलचे सर्वाधिककाळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.
जगातील महागडं अमेरिकेचं अत्याधुनिक विमान कोसळलं
- जपानचे एफ-३५ हे अत्याधुनिक फायटर विमान शुक्रवारी पॅसिफिक महासागरात कोसळले. एफ-३५ हे अमेरिकन बनावटीचे जगातील अत्याधुनिक फायटर विमान आहे. एफ-३५ च्या अपघातामुळे जगातील या महागडया फायटर विमानाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्तर जापानमधील मिसावा एअर फोर्सच्या तळावरुन सरावासाठी या स्टेल्थ फायटर विमानाने उड्डाण केले होते.
- जपानी आणि अमेरिकन विमाने, युद्धनौका बेपत्ता वैमानिकाचा शोध घेत आहेत. F-35 विमानाचा वैमानिक चाळीशीतील होता तसेच त्याच्याकडे ३,२०० तास उड्डाणाचा अनुभव होता.
- एफ-३५ हे अमेरिकेमध्ये विकसित झालेले आजच्या घडीचे जगातील सर्वात प्रगत फायटर विमान आहे. चीनची वाढती लष्करी ताकत लक्षात घेऊन जपानने आपल्या हवाई दलाला सक्षम करण्यासाठी अमेरिकेकडून एफ-३५ विमाने विकत घेतली आहेत.
महिला कार रॅली : दीपा, प्रियांका यांना विजेतेपद
- वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या ‘वुमन्स रॅली टू द व्हॅली’ या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बुधवारी सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल ८७ विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
- विनिशा सिंग सावंत आणि अयोश्मिता बिस्वास यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला. मनीषा गेंद आणि मालू गुप्ता यांच्या संघाने चौथ्या क्रमांकावर मजल मारली तर काला चंद्रकांत सोनी आणि हिमानी शर्मा यांनी पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मल्लिका राय आणि नेहा खंडेलवाल यांनी सहावा क्रमांक पटकावला.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी अभय ओक यांच्या नावाची शिफारस
- मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती अभय ओक यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने (कॉलेजियम) केली आहे.
- कर्नाटक उच्च न्यायालयाचे वर्तमान मुख्य न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी न्यायमूर्ती ओक यांची मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.
- न्यायमूर्ती ओक हे मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायमूर्ती असून त्यांनी आतापर्यंत जनहितार्थ अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. त्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा एकीकडे वैध ठरवता गोमांस बाळगणे गुन्हा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने मे २०१६ रोजी दिला होता.
‘बुकर इंटरनॅशनल’साठी पाच लेखिकांना नामांकन
- लंडन अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘बुकर इंटरनॅशनल’ पुरस्कारासाठी गतवर्षीच्या विजेत्या पोलिश लेखिका ओल्गा टोकरक्रूझ यांना यंदा पुन्हा नामांकन मिळाले आहे. या वर्षी नामांकन मिळालेल्या सहा जणांमध्ये पाच लेखिकांचा समावेश आहे.
- जगभरातील कादंबऱ्यांच्या इंग्रजी अनुवादासाठी ब्रिटनमध्ये ‘बुकर इंटरनॅशनल’ पुरस्कार दिला जातो. ओल्गा टोकरक्रुझ यांना सन २०१८मध्ये ‘फ्लाइट्स’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता. यंदा त्यांना ‘ड्राइव्ह युवर प्लो ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ या कादंबरीसाठी नामांकन मिळाले आहे.
- त्यांच्याखेरीज ‘सेलेस्टियल बॉडीज’ या कादंबरीसाठी ओमानच्या जोखा अलहार्थी, ‘द इयर्स’साठी फ्रान्सच्या अॅनी अरनॉक्स, ‘द पाइन आयलंड’साठी जर्मनीच्या मेरीयन पोशमन, ‘द रिमाइंडर’साठी चिलीच्या आलिया ट्राबुको झेरान आणि ‘द शेप ऑफ द रुइन्स’साठी कोलंबियाचे जुआन गॅब्रियल वास्केझ या लेखकांना नामांकन मिळाले आहे. तब्बल ५० हजार पौंडांचा हा पुरस्कार मूळ लेखक आणि अनुवादक यांना समसमान विभागून दिला जातो. २१ मे रोजी लंडनमध्ये या पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा होणार आहे.
कृष्णविवराचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध
- अवकाशशास्त्रातील सर्वांत रंजक कल्पना असणाऱ्या कृष्णविवराचा पहिले छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. शास्त्रज्ञांनी बुधवारी हे ऐतिहासिक छायाचित्र प्रसिद्ध केले.
- पृथ्वीपासून पाच कोटी प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एम८७ या आकाशगंगेमध्ये हे कृषणविवर आहे. केशरी रंगांच्या प्रकाशझोतांच्या आणि पांढऱ्या तप्त वायू व प्लाझ्मांमध्ये हे कृष्णविवर आहे. शास्त्रज्ञांकडून १८व्या शतकापासून कृष्णविवराची संकल्पना मांडण्यात आली आहे.