गूगल डूडलने केला ‘भारताच्या सॅटेलाईट मॅन’चा सन्मान
गूगल डूडलने प्रख्यात भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडुपी रामचंद्र राव यांचा ८९ वा वाढदिवस साजरा केला, ज्यांना लोक “भारताचे सॅटेलाईट मॅन” म्हणून ओळखतात.
डूडलमध्ये उजव्या हातात उपग्रह घेतलेले प्रोफेसर राव यांचे रेखाटन आहे आणि त्यांच्यामागे अंतराळ आणि पृथ्वीचे चित्र आहे. “आपली ताऱ्यांच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजुनसुध्दा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे,” असं गुगलने त्यांच्या वर्णनात लिहिलं आहे.
भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) चे अध्यक्ष असलेले राव यांनी १९७५ साली “आर्यभट्ट” या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते.
“१० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील एका दुर्गम गावात प्रा. राव यांचा जन्म झाला.
त्यांनी वैश्विक किरणशास्त्रज्ञ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. डॉक्टरेट पूर्ण केल्यावर प्रो. राव अमेरिकेत गेले, जिथे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आणि नासाच्या पायोनियर आणि एक्सप्लोरर स्पेस प्रोब या प्रकल्पांवर देखील काम केले, ” असे गुगल डूडलच्या संकेतस्थळावरील वर्णनात लिहिले आहे.
१९६६ मध्ये भारतात परत आल्यावर प्रा. राव यांनी भौतिक विज्ञान संशोधन प्रयोगशाळेत, एक व्यापक उच्च उर्जा खगोलशास्त्र कार्यक्रम सुरू केला. १९८४ ते १९९४ पर्यंत प्रो. राव यांनी भारताच्या अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले.
२०१३ मध्ये राव सॅटेलाईट हॉल ऑफ फेममध्ये सामील झाले, त्याच वर्षी पीएसएलव्हीने मंगळाभोवती परिक्रमा करणाऱ्या ‘मंगलयान’ या भारताच्या पहिल्या आंतरखगोलिय प्रकल्पाची सुरूवात केली. २०१७ मध्ये त्यांचे निधन झाले.
रशिया-चीन मिळून करणार चंद्राबाबत संशोधन
चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्र संशोधन स्टेशन तयार केले जाणार असल्याचे चीन आणि रशियाने म्हटले आहे.
दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्यात नवीन पर्वाची सुरूवात या निमित्ताने होणार आहे.
हे संशोधन केंद्र म्हणजे सर्वसमावेशक वैज्ञानिक प्रयोगांचा तळ असेल. यामध्ये दीर्घकाळासाठी खगोलशास्त्रीय कार्य केले जाऊ शकेल.
हे संशोधन स्टेशन चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा चंद्राच्या कक्षेत तयार केले जाईल.
या प्रकल्पाबाबत मंगळवारी चीनची राष्ट्रीय अंतराळ संस्थेचे व्यवस्थापक झॅंग केजियान आणि रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांच्यात मंगळवारी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
2003 मध्ये पहिली चांद्रमोहिम सुरू केल्यापासून स्वतःच वेगळा मार्ग निवडायला सुरुवात केली आहे.
‘आयएनएस करंज’नौदलाच्या सेवेत दाखल
भारतीय नौदलासाठी स्कॉर्पिन प्रकारची तिसरी पाणबुडी आयएनएस करंज मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली.
1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान कमांडिंग ऑफिसर असलेले, माजी नौदलप्रमुख ऍडमिरल व्ही.एस.शेखावत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
फ्रान्सच्या मे.नेव्हल ग्रुप या कंपनीच्या संयुक्त सहभागाने भारतात माझगाव डॉक शिपबिल्डर्स (मर्या.) या मुंबईतील कंपनीतर्फे स्कॉर्पिन श्रेणीतील एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे.
“आयएनएस’ करंज ही पाणबुडी पश्चिमी नौदल कमांड ताफ्याचा भाग असेल आणि कमांडच्या शस्त्रास्त्रांचा आणखी एक अत्यंत शक्तिशाली विभाग म्हणून काम करेल.
यापूर्वीची करंज ही रशियन बनावटीची फॉक्सट्रॉट प्रकारची पाणबुडी 2003 साली सेवेतून निवृत्त करण्यात आली होती, त्या पाणबुडीचा सर्व कर्मचारीवर्ग या समारंभाला विशेष आमंत्रित म्हणून यावेळी उपस्थित होता.
फ्रान्सकडून प्रथमच अंतराळात युद्धसराव
फ्रान्सने या आठवड्यात पहिल्यांदाच अवकाशात लष्करी अभ्यास सुरू केला.
अंतराळातून होणाऱ्या हल्ल्यापासून फ्रान्सचे उपग्रह आणि इतर संरक्षण उपकरणांचे संरक्षण करण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी हा अंतराळातील युद्धसराव केला गेला.
अशाप्रकारे अंतराळात युद्धसराव करणारे ते फ्रेंच सैन्यासाठी आणि युरोपमधील पहिलेच असल्याचे ते म्हणाले.
या अंतराळातील युद्धसरावाचे कोड नाव “ऍस्टरेक्स’ असे आहे. फ्रान्सने 1965 साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.
या युद्धसरावांतर्गत ऑपरेशन रूममध्ये 18 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कारवाईचा अनुभव घेतला जाणार आहे.
या युद्धसरावामध्ये अंतराळातील धोकादायक पदार्थ, फ्रान्सच्या उपग्रहांना धोका असलेल्या परिस्थिती आणि अंतराळातून हल्ला करण्याची क्षमता असलेल्या विदेशी शक्तींचा सामना फ्रान्सच्या लष्कराला करावा लागणार आहे.
अमेरिकेची नवीन स्पेस फोर्स आणि जर्मनीची स्पेस एजन्सी फ्रेंच युद्धसरावामध्ये भाग घेत आहेत.
फ्रान्सच्या अंतराळ सुरक्षा दलाची स्थापना 2019 साली केली गेली आणि 2025 पर्यंत त्यामध्ये 500 तज्ञ सहभागी असणे अपेक्षित आहे.