अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
- मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा अडसर दूर झाला. पुढील 3 दिवसांत अजोय मेहता पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत.
अजोय मेहता यांनी 2015 मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता.
तब्बल 4 वर्ष त्यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे सांभाळली. 27 एप्रिल 2019 रोजी अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची 4 वर्ष पूर्ण केली. मुंबई महापालिकेच्या कारभारात सर्वाधिक काळ पदभार स्वीकारणारे अजोय मेहता हे पहिले आयुक्त आहे. यापूर्वी सदाशिव तिनईकर यांनी 1986 ते 1990 मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त होते.
Amazon चंद्रावर जाण्याच्या तयारीत; पाठवणार मून लँडर
- अॅमेझॉन चंद्रावर आपले यान पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनी ही घोषणा केली. ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’ अंतर्गत त्यांनी मून लँडर लॉन्च केले. हे मून लॅन्डर चार रोव्हर्स, नव्या पद्धतीने डिझाईन केलेले रॉकेट आणि सूपअप रॉकेटला वाहून नेण्यास सक्षम असल्याची माहिती बेझॉस यांनी दिली.
- गेल्या तीन वर्षांपासून नासाच्या वैज्ञानिकांसह आपण या मून लँडरवर काम करत असल्याचे बेझॉस म्हणाले. परंतु हे मून लँडर अवकाशात कधी झेपावेल याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सत्तेवर येताच ‘मिशन मून’ लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने 2024 पर्यंत चंद्रावर पाऊल ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले होेते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अॅमेझॉनने ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’वर नासाबरोबर काम करण्यास सुरूवात केली होती.
- सध्या चीन, जपान, अमेरिकेसहित अनेक देश चंद्रावरील रहस्य जाणून घेण्यासाठी या अभियानावर काम करत आहेत. 1966 साली सोव्हिएत महासंघाने चंद्रावर ‘लूना 9’ उतरवले होते. त्यानंतर अमेरिकेनेही आपली महत्त्वाकांक्षी अपोलो ही मोहीम राबवली होती.
पुणे विद्यापीठातील संशोधकांनी शोधली प्लास्टिकचं विघटन करणारी बुरशी
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विभागातील संशोधकांनी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे संशोधन केले आहे. विद्यापीठातील सांशोधकांनी प्लास्टिकचं विघटन करु शकणारी बुरशी शोधून काढली आहे.
- खारफुटीच्या झाडांच्या मुळांवर ही बुरशी आढळून येते. एसपरगिलस या गटातील ही बुरशी आहे. मनीषा सांगळे, मोहमद शाहनवाज आणि डॉ अविनाश आडे यांनी हे संशोधन केले आहे. 2014 पासून यावर ते काम करत होते. या बुरशीमुळे पॉलिथीन या प्लास्टिकच्या प्रकारातील रेणू (मोलेक्युल) हे कमकुवत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याचे विघटन करण्याची पद्धत सोपी होते असेही त्यांना आढळले.या संशोधनाची दखल नेचर मॅगझीननेही घेतली आहे. हे संशोधन सिद्ध करणारा रिसर्च पेपर एप्रिल महिन्यातील नेचर मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पण हे संशोधन प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी काही वेळ लागेल असे संशोधक आणि प्राध्यापक अविनाश आडे यांनी सांगितले.