⁠  ⁠

चालू घडामोडी : १२ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

Current Affairs 12 February 2020

HockeyIndia : भारताची ‘लालरेम्सियामी’ ठरली ‘रायझिंग स्टार’ पुरस्काराची मानकरी

IMG 20200211 220028

भारतीय महिला हाॅकी संघाची खेळाडू ‘लालरेम्सियामी’ ही आंतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनच्या (FIH) २०१९ च्या रायझिंग स्टार पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
१९ वर्षीय ‘लालरेम्सियामी’ हिने अर्जेंटिनाच्या जूलिएटा जांकुनासला (व्दितीय) तर नेदरलॅन्डसच्या फ्रेडरिक माटला हिला (तृतीय) मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाने याची घोषणा केली.
मिझोरमच्या लालरेम्सियामी हिला सर्व राष्ट्रीय संघटनेकडून ४० टक्के मते मिळाली, तर मीडियाकडून २८.४ टक्के मते आणि चाहते/खेळाडूंकडून ३६.४ टक्के मते मिळाली.
साल २०१७ साली बेलारूस विरू ध्दच्या सामन्यातून लालरेम्सियामी हिने भारतीय संघात पदार्पण केले. तिने २०१७ मध्ये कोरिया आणि २०१९ मध्ये स्पेनविरूध्द सर्वाधिक गोल केले होते.

राष्ट्रीय स्नूकर स्पर्धा : आदित्य मेहताने पटकावले विजेतेपद

IMG 20200211 173442

पेट्रोलियम खेल संवर्धन बोर्डाचे ( पीएसपीबी ) प्रतिनिधित्व करणा-या आदित्य मेहताने ‘पीएसपीबी’च्या पंकज अडवाणीचा पराभव करत राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेतील पुरूष गटाचे विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत आदित्यने पंकज अडवाणीचा १०३( १०३)-१७, ५०-५८, ४७-४८, ७०-४०, ८३(५१)-३६, ६९(६१)-७, ७९-२९, ६४-२८ असा पराभव केला. ही लढत साडेसहा तास चालली.
स्पर्धेत तिस-या स्थानासाठी झालेल्या लढतीत ‘पीएसपीबी’च्या लक्ष्मण रावतने ‘आरएसपीबी’ च्या पुष्पेंदरसिंगचा ७१-५, ३५-८३, ६४-८, ६२-२६ असा पराभव केला.
दरम्यान, यापूर्वी २०१६ मध्ये इंदूरला झालेल्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत आदित्यने मनन चंद्राला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.

गगनयान मोहिमेतील चौघांचे रशियात प्रशिक्षण सुरू

Gaganyan

भारताच्या गगनयान या मानवी अवकाश मोहिमेत प्राथमिक निवड करण्यात आलेल्या चार उमेदवारांचे प्रशिक्षण रशियातील मॉस्को येथे असलेल्या गागारिन संशोधन व अवकाशवीर प्रशिक्षण केंद्रात (जीसीटीसी) सुरू झाले आहे.
भारतीय हवाई दलाच्या चार वैमानिकांची निवड यात अवकाशवारीसाठी करण्यात आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था २०२२ मध्ये गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीयांना अवकाशात पाठवणार आहे. या मोहिमेत एकूण तीनजणांना सात दिवस अवकाशवारीची संधी मिळणार असून गगनयान मोहिमेचा खर्च १० हजार कोटींच्या घरात आहे. पृथ्वीपासून ३००-४०० कि.मी.च्या कक्षेत हे अवकाशवीर यानातून फिरणार आहेत.
रशियाच्या ग्लावकॉसमॉस या संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे की, सोमवारी जीसीटीसी या संस्थेत भारतीय उमेदवारांचे अवकाश प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी ग्लावकॉसमॉस, जेएससी व इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र यांच्यात करार झाला आहे. हे प्रशिक्षण बारा महिन्यांचे असून त्यात र्सवकष बाबींचा समावेश आहे. जैववैद्यकीय प्रशिक्षण यात महत्त्वाचे असून त्याबरोबरच अवकाशातील शारीरिक हालचालींचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. सोयूझ या माणसाला अवकाशात घेऊन जाणाऱ्या अवकाशयानातील यंत्रणांची माहिती त्यांना करून देण्यात येईल. वजनरहित अवस्थेत राहण्यासाठी त्यांना खास विमानाने नेऊन प्रशिक्षण दिले जाणार आहे. अवकाशयानाचे अवतरण दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने झाले तर काय कृती करायची हेही संभाव्य अवकाशवीरांना शिकवले जाणार आहे. मानवी अवकाश मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी इस्रोचे मानवी अवकाशमोहीम केंद्र व ग्लावकॉसमॉस यांच्यात २७ जून २०१८ रोजी करार झाला होता.

सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून खरेदी करणार NASAMS-II

nasams ii

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या सुरक्षेसाठी भारत अमेरिकेकडून ‘नॅशनल अॅडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम – II’ (NASAMS-II) खरेदी करण्याच्या तयारीत आहे. भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्रायली प्रणालींसोबत मिळून एक बहुस्तरीय ढाल बनवण्यासाठी करू शकेल.
या सुरक्षा प्रणालीमुळे राजधानी दिल्ली केवळ मिसाईल हल्ल्यापासून नाही तर ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईलपासूनही सुरक्षित राहील. अर्थातच, दिल्लीत ९/११ सारखे हल्ले घडवून आणणं दहशतवाद्यांसाठी अशक्यप्राय गोष्ट होईल.
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आपल्या तब्बल ६००० कोटी रुपयांच्या ‘परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमांतर्गत’ भारताला NASAMS-II ची विक्री करणार आहे. यासाठी अमेरिकेकडून स्वीकृती पत्राचा अंतिम मसुदा जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे.
करार झाल्यानंतर पुढच्या चार वर्षांत अमेरिकेकडून ही सुरक्षा प्रणाली भारताकडे हस्तांतरीत केली जाईल. सुरक्षा मंत्रालयानं (MoD) याआधीच NASAMS-II साठी आवश्यक परवानगी मिळवली आहे. त्यानंतर भारताकडून अमेरिकेला औपचारिकरित्या पत्र धाडण्यात आलं होतं.
या करारांतर्गत अमेरिकेकडून भारतावर टर्मिनल हाय अल्टिट्युड एरिया डिफेन्स (THAAD) आणि पॅटियट अॅडव्हान्स्ड कॅपेबिलिटी (PAC-3) मिसाईल डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जातोय. परंतु, सुरक्षा मंत्रालयानं मात्र यासंदेर्भात ‘आधुनिक एस-४०० ट्रायम्फ’ या हवेतून मारा करणाऱ्या प्रणालीच्या पाच स्क्वॉड्रनसाठी रशियासोबत अगोदरच सौदा केल्याचं स्पष्ट केलंय.

Share This Article