चालू घडामोडी : १२ मे २०२१
बहारीन प्रिन्सच्या टीमने सर केले एव्हरेस्ट, नोंदविले नवे रेकॉर्ड
बहारीनचे प्रिन्स मुहम्मद हमद मुहम्मद अल खलीफा यांनी त्यांच्या १६ सदस्य टीम सह एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली असून नवे रेकॉर्ड नोंदविले आहे.
त्यांनी त्यांच्या रॉयल गार्ड टीम बरोबर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले असून एव्हरेस्टच्या नव्या उंचीवर पोहोचणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय टीम ठरली आहे.
प्रिन्सच्या या मोहिमेचे आयोजन सेवन समिट ट्रॅकने केले होते.
बहारीनची टीम १५ मार्चला काठमांडू येथे दाखल झाली होती. एव्हरेस्ट शिखर सर करण्याची या टीमची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी लोबूचे शिखर, माउंट मनायु सर् केले आहे. रॉयल गार्ड हे बहारीनच्या संरक्षण सेनेचे युनिट आहे.
पंतप्रधानांचा जी-७ दौरा रद्द
देशात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ११ ते १३ जून या कालावधीत जी-७ देशांची शिखर परिषद होणार आहे.
या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदी यांना विशेष निमंत्रित म्हणून निमंत्रण दिले होते.
चीनच्या लोकसंख्येत ०.५३ टक्के वाढ
चीनच्या लोकसंख्येत ०.५३ टक्के वाढ झाली असून ती आता १.४११७८ अब्ज होणार आहे.
२०१९ मध्ये ती १.४ अब्ज होती त्यामुळे अजूनही जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनचा क्रमांक वरचा राहणार आहे.
पुढील वर्षापासून चीनची लोकसंख्या वाढ कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता निर्माण होतानाच वस्तूंचा खप कमी होणार आहे.
सातव्या राष्ट्रीय जनगणनेची आकडेवारी चीन सरकारने जाहीर केली असून चीनची लोकसंख्या ३१ स्वायत्त प्रदेशांत वाढली असून १.४११७८ अब्ज झाली आहे.
या लोकसंख्येत हाँगकाँग व मकाव यांच्या नागरिकांचा समावेश नाही.
२०१० मधील लोकसंख्येच्या तुलनेत या लोकांचे प्रमाण ६.७९ टक्क्यांनी कमी झाले आहे. लोकसंख्यावाढीचा दर १९८२ मध्ये २.१ टक्के होता.
वर्षांतील जन्मदर घट ही २२ टक्के आहे. चीनचा लैंगिकता प्रमाण दर घसरला असून १०५.०७ पुरुषांमागे १०० स्त्रिया आहेत. २०१० मध्ये हे प्रमाण १०५.२ होते.
पुडुचेरी प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा करणारे चौथे राज्य / केंद्रशासित प्रदेश
पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाने जल जीवन अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा देण्याचा संकल्प पूर्ण केला.
असे करणारे पुडुचेरी हे गोवा, तेलंगणा आणि अंदमान व निकोबार बेटे यांच्या पाठोपाठ देशातील चौथे राज्य / केंद्रशासित प्रदेश तसेच दुसरे केंद्रशासित प्रदेश ठरले आहे.
जल जीवन अभियान
जल जीवन अभियानाचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आला. भारत सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे. अभियानाच्या अंमलबजीवणीची जबाबदारी जलशक्ती मंत्रालयाला देण्यात आली आहे.
2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.