देश-विदेश
रसद पुरवठा देवाणघेवाणीवर भारत-अमेरिका यांच्यात मतैक्य
भारत व अमेरिका यांनी लष्कराच्या मालमत्तांचा वापर, नाविक व हवाई तळांची दुरुस्ती-देखभाल तसेच सामग्रीचा पुरवठा याबाबत एकमेकांना मदत करण्याचे ठरवले आहे. मागील यूपीए सरकारच्या काळात ही सहमती शक्य झाली नव्हती. दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा अमेरिकेलाही फटका बसल्याची कबुली अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांनी दिली.
एल निनोचा प्रभाव ओसरणार
यंदाच्या वर्षी एल निनोचा प्रभाव मान्सून काळात कमी राहणार असून त्या जोडीला ला निना परिणाम जाणवणार असल्याने पाऊस चांगला होण्याची अपेक्षा आहे. ला निना (लहान मुलगी) हा परिणाम विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये पाणी थंड झाल्याने अनियमित कालांतराने दिसतो, त्यामुळे हवामानात काही बदल होतात. भारतात एल निनो ही नेहमीच चिंतेची बाब आहे कारण त्याचा नैर्ऋत्य मान्सूनवर विपरीत परिणाम होतो. तसा तो २००९ व २०१५ मध्ये जास्त जाणवला. ला निना हा मान्सूनला फायद्याचा परिणाम आहे.
‘केंद्राचा अखर्चित १० टक्के निधी वापरा’
केंद्र सरकारकडून नैसर्गिक संकटासाठी मिळालेल्या अखर्चित निधीतील १० टक्के निधी दुष्काळग्रस्त राज्यांनी खर्च करावा, अशी सूचना केंद्रीय ग्रामविकासमंत्री वीरेंद्र सिंग यांनी मंगळवारी केली.
महाराष्ट्र
योग व निसर्गोपचार विधेयक विधान परिषदेत मंजूर
योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासाची संधी निर्माण करतानाच या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देणे आवश्यक आहे. योग हा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाला असून, या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला.
क्रीडा
आयपीएलचे ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा- उच्च न्यायालय
आयपीएलचे ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर खेळवा, असे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले. आयपीएल सामन्यांवर उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान हा निकाल देण्यात आला. आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर हलवल्याने दुष्काळाचा प्रश्न सुटणार नसला तरी सामन्यांसाठी लागणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांना पुरविल्यास ही समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते, असे यावेळी न्यायालयाने म्हटले. आयपीएलचे सामने हलवून पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असा बीसीसीआयचा दावा असला तरी आम्ही गंभीर परिस्थितीत असलेल्या दुष्काळग्रस्तांकडे डोळेझाक करू शकत नाही, असे न्यायलयाने म्हटले.