चालू घडामोडी – १४ एप्रिल २०१६
देश-विदेश
काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद
श्रीनगर – हंडवाडा येथे लष्करी जवानांच्या गोळीबारात युवा क्रिकेटपटूसह तिघांचा मृत्यू झाल्यानंतर याठिकाणी पसरणाऱ्या अफवांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबाराच्या घटनेनंतर अफवांवर नियंत्रण मिळविण्यासाठी श्रीनगर, कुपवाडा, बारामुल्ला, बंदिपुरा आणि गंदेरबाल जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. हंदवाडा व श्रीनगरमधील काही भागात अद्याप संचारबंदी लागू असून, कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शेतीव्यवस्था ‘ऑनलाईन’साठी सरकार प्रयत्नशील
नवी दिल्ली: केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी बाजारपेठ (नाम) योजनेंतर्गत देशातील आठ राज्यांमधील 21 घाऊक कृषी बाजारपेठांचा/मंडई एकत्रित ऑनलाईन मंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत देशातील 585 नियंत्रित बाजारपेठांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “नाम‘ या ई-ट्रेडिंग मंचाचे उद्घाटन केले जाणार आहे. राष्ट्रीय कृषी बाजारपेठ योजनेंतर्गत देशातील 585 नियंत्रित बाजारपेठा किंवा कृषी उत्पादन बाजार समित्या एका ऑनलाईन मंचावर एकत्रित करण्याची योजना आहे,‘ अशी माहिती राधामोहन सिंग यांनी दिली आहे,
भारताने केली ‘के-४’ क्षेपणास्त्राची गुप्त चाचणी
नवी दिल्ली – भारताने अण्वस्त्रवाहू ‘के-४’ या महत्वाकांक्षी क्षेपणास्त्राची चाचणी केली. या अण्वस्त्रवाहून क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५०० किलोमीटर आहे. या चाचणीमुळे भारताचा समावेश मोजक्या देशांच्या पंगतीत झाला आहे. समुद्रात अत्यंत गुप्त ठिकाणी ‘अरिहंत’ या अणुपाणबुडीतून या क्षेपणास्त्राची मार्चमध्ये दोन वेळा चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र ३५०० किलो शस्त्रास्त्र वाहून नेऊ शकते. भारताचे माजी राष्ट्रपती व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे प्रमुख अब्दुल कलाम यांच्या नावाने तयार केले आहे. ‘के’ मालिकेतील तीन क्षेपणास्त्र विकसित करण्याचे डीआरडीओने ठरवले आहे.
क्रीडा
दिव्या देशमुख आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन
प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला फिडे मास्टर दिव्या देशमुखने मंगोलिया येथील अलानबटर येथे सुरू असलेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत १२ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या दिव्याने बुद्धिबळाच्या ब्लिट्झ प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्टॅंडर्ड प्रकारात तिने सुवर्णपदक पटकावून मंगोलियात भारताचा झेंडा फडकावला. रॅपिड प्रकारात तिने रौप्यपदक मिळवले आहे.
भारताची हार
कामगिरीतील सातत्याचा अभाव व भारतीय हॉकी संघ यांचे अतूट नाते आहे. पाकिस्तानला नमवणाऱ्या भारताला अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत बुधवारी न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला मलेशियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे अनिवार्य आहे.
आयपीएल राज्यातून ‘आउट’
मुंबई – ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतील मुंबई, पुणे व नागपूरमधील ३० एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर हलवा असा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला. दुष्काळी परिस्थितीमुळे फ्रॅंचाईझी हे सामने स्वतःहून हलवतील असे आम्हाला वाटले होते; पण राज्य सरकारची भूमिका त्याहूनही धक्कादायक आहे, अशा स्थितीत न्यायालय मूक प्रेक्षक राहू शकत नाही, असे सांगून खंडपीठाने वरील आदेश दिला. या संदर्भात पुढील सुनावणी दोन मे रोजी होणार आहे.
अर्थशास्त्र
भारतामुळे दक्षिण आशियाचा विकासदर सर्वाधिक
वॉशिंग्टन : भारताच्या विकासाची आगेकूच सुरू असल्याने दक्षिण आशिया हा जगातील सर्वाधिक वेगाने विकास होणारा प्रदेश ठरणार आहे. या विभागातील आर्थिक वाढ 2016 मधील 7.1 टक्क्यांवरून 2017 मध्ये 7.3 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तविला आहे.