नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर
- भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे, असे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.
- रशियाने नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अॅण्ड्रू दी अपोस्टल’हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतो.
- मोदी यांना यूएईने ४ एप्रिल रोजी सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. त्यापूर्वी दक्षिण कोरिया, सौदी अरब आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन गौरविले आहे.
फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले ‘नंबर वन’ नेते
- 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता मिळवली.
सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. - नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.
- 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत.
मिशन शक्ती: ‘पेंटागॉन’ने केले भारताचे समर्थन
- ‘ही तर काळाची गरज आहे’, असं मत नोंदवत अमेरिकेने भारताच्या ‘मिशन शक्ती’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे समर्थन केले आहे. भारताला अंतराळ सुरक्षेची चिंता भेडसावत आहे आणि त्यातूनच अशी चाचणी आवश्यक ठरते, असे ‘पेंटागॉन’ने पुढे नमूद केले.
- भारताने ‘मिशन शक्ती’ या मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल टाकत २७ मार्च रोजी जमिनीवरून उपग्रहाचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीबरोबरच अमेरिका, रशिया आणि चीन या महासत्तांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले. त्यानंतर जागतिक पातळीवरून भारताच्या या मिशनबाबत विविध मते पुढे आली असताना पेंटागॉनने या मिशनचा उघडपणे बचाव केला आहे.
महागाई दर वाढून ३ टक्क्यांनजीक
- इंधनाबरोबरच अन्नधान्याच्या किमती भडकल्याने सरलेल्या मार्च महिन्यातील महागाई दर ३ टक्क्यांनजीक पोहोचला आहे. किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारीत हा दर मार्चमध्ये २.८६ टक्के नोंदला गेला आहे.
- महिन्याभरापूर्वी, फेब्रुवारीमध्ये महागाई दर २.५७ टक्के तर वर्षभरापूर्वी, मार्च २०१८ मध्ये तो ४.२८ टक्के होता. रिझव्र्ह बँकेच्या ४ टक्के या समाधानकारक महागाई अंदाजापेक्षा यंदाचा दर कमी असला तरी तो महिन्यागणिक वाढला आहे.
- महागाई दरामध्ये अन्नधान्याच्या किमती महिन्याभरापूर्वीच्या उणेस्थितीतून उंचावत ०.३ टक्क्यांवर आल्या आहेत. तर इंधन व ऊर्जा गटातील किमती १.२४ टक्क्यावरून जवळपास दुप्पट वाढून, २.४२ टक्क्यांवर पोहोचल्या होत्या.
- फळे, भाज्यांच्या किमती अजूनही उणे स्थितीत आहेत. गेल्या महिन्यात त्या उणे ५.८८ टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत. मसाल्यांच्या किमती काहीशा कमी होत त्या १.२५ टक्क्यांपर्यंत स्थिरावल्या आहेत.
जेट एअरवेजची सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द
- रोख पैशांच्या कमालीच्या टंचाईला तोंड देत असलेल्या जेट एअरवेजने आपली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली असून, देशातील उड्डाणेही कमी कमी करीत आणली आहेत. या पार्श्वभूमीवर या कंपनीच्या अस्तित्वाबद्दलही प्रश्न निर्माण झाला आहे.
- गेल्या काही महिन्यांत कंपनीने १५ पेक्षा जास्त छोट्या अंतरांची उड्डाणे रद्द केली आहेत. त्यात आखात, आग्नेय आशिया आणि सार्क देशांचा समावेश आहे. जेट एअरवेजने सिंगापूर आणि काठमांडूची उड्डाणे रद्द केली, तर गुरुवारी सायंकाळी अॅमस्टरडॅम, पॅरिस आणि लंडनची विदेशी उड्डाणे रद्द केली.