Current Affairs 14 November 2019
सरन्यायाधीश माहिती अधिकारात!
सरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येते, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. मात्र, ‘जनहिता’साठी माहिती जाहीर करताना न्यायिक स्वातंत्र्य लक्षात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने याबाबतचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल वैध ठरवत तीन याचिका फेटाळून लावल्या. या निकालामुळे न्यायिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांचा समतोल साधला गेला आहे. मात्र, सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत येत असले तरी सरन्यायाधीशांवर पाळत ठेवण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ नये. पारदर्शकतेचा विचार करताना न्यायिक स्वातंत्र्याचीही बूज राखावी लागेल, असे घटनापीठाने स्पष्ट केले.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव तसेच केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत असल्याचा निकाल दिला. न्यायवृंदाने नेमणुकीसाठी कोणत्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, हे या कायद्यानुसार जाहीर करता येईल. मात्र, त्यामागची कारणे जाहीर करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता, न्या. संजीव खन्ना यांनी एक निकालपत्र दिले, तर न्या. रामण्णा आणि न्या.चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली.
माहिती अधिकाराअंतर्गत कोण?
- कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका (सरन्यायाधीशांसह) ही तिन्ही घटनात्मक आस्थापने
- संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना
- केंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा आस्थापना
- केंद्र वा राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था
- प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना
- खासगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या संस्था. उदा. वीज कंपन्या
- अशा खासगी संस्था ज्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी पाठबळ मिळते
कोण नाही?
- खासगी संस्था वा संघटना
- राजकीय पक्ष (यासंबंधीची याचिका न्यायप्रविष्ट)
महागाईचा उच्चांक
ऐन दसरा, दिवाळीच्या महिन्यात महागाई दर रिझव्र्ह बँकेच्या सहनशील अशा ४ टक्क्य़ांच्या खूपच पुढे सरकला. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने ऑक्टोबरमधील महागाई दर गेल्या १६ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला आहे.
अवकाळी पावसामुळे भाज्यांसह सर्वच जिन्नसांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचा परिणाम महागाई निर्देशांकात नोंदला गेला. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर ७.८९ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी तो ५.११ टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या किमती तब्बल २६.१० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर फळांचे दर ४.०८ टक्क्य़ांवर गेले आहेत. त्याचबरोबर डाळी, मटण, मासे यांच्या किमतीही वेगाने वाढल्या आहेत.
नीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड
रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. या म्युझियमच्या विश्वस्तपदी निवड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.
भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी नीता अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचं बोर्डस्की यांनी स्पष्ट केलं. नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.
स्पेनचा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया निवृत्त
स्पेनसाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया याने बुधवारी आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय व्हिया पुढील महिन्यात जे-लीगच्या मोसमाअखेरीस आपल्या १९ वर्षांच्या कारकीर्दीला अलविदा करणार आहे.
व्हियाने बार्सिलोना, अॅटलेटिको माद्रिद आणि व्हॅलेंसिया या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केले. याचप्रमाणे स्पेनसाठी तो ९८ सामने खेळला आहे. ‘‘माझ्या व्यावसायिक कारकीर्दीचा समारोप करण्याचे मी ठरवले आहे. निवृत्तीविषयी मी बऱ्याच महिन्यांपासून विचार करत होतो. माझे कुटुंबीय तसेच जवळच्या व्यक्तींशी चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला आहे,’’ असे व्हियाने सांगितले.
‘फेसबुक पे’ अखेरअमेरिकेत सादर
फेसबुक’ने आपल्या ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’, ‘मेसेंजर’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या कंपन्यांच्या माध्यमातून पेमेंट अदा करण्यासाठी ‘फेसबुक पे’ ही पेमेंट गेट-वे सिस्टीम नुकतीच सादर केली. या सिस्टीमच्या माध्यमातून अमेरिकेत निधी गोळा करणे, इन-गेम खरेदी, कार्यक्रमांची तिकिटे, व्यक्तिगत पेमेंट, फेसबुक मार्केट प्लेसवर पेजेस आणि व्यापारी पेमेंट करण्याची संधी मिळणार आहे.
‘फेसबुक’चे उपाध्यक्ष (मार्केटप्लेस आणि कॉमर्सविंग) देबोराह लियू यांनी मंगळवारी रात्री या संदर्भात निवेदन प्रसारित केले. ‘गेल्या काही वर्षांपासून फेसबुकची स्वतंत्र पेमेंट गेट-वे सिस्टीम उभी करण्याचा आमचा प्रयत्न होता. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरील उपभोक्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे,’ असे लियू यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ‘फेसबुक’ आणि ‘मेसेंजर’वर काही टप्प्यांनंतरच ‘फेसबुक पे’चा वापर करता येणार आहे. त्यासाठी ‘फेसबुक अॅप’ किंवा वेबसाइटवर जाऊन सेटिंगमध्ये जाण्याची गरज आहे. त्यानंतर ‘फेसबुक पे’वर जाऊन पेमेंट मेथड जोडणे आवश्यक आहे. त्यानंतरच ग्राहकांना ‘फेसबुक पे’चा वापर करता येईल.