Current Affairs 15 February 2020
न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा
निवृत्तीला आणखी दोन वर्षे शिल्लक असताना तसेच अन्य राज्यांतील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढतीही देण्यात येत असतानाही मुंबई उच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला.
वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे आपण मुंबई सोडण्यास इच्छुक नाही आणि याच कारणास्तव आपल्याला अन्य राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही बदली नको आहे, असे कारण न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी राजीनाम्यासाठी दिले आहे.
नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे निधन
पर्यावरण तज्ज्ञ, दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) संस्थापक संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे गुरूवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मंगळवारपासून पचौरी यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते.
नारायण मूर्तींचे जावई बनले ब्रिटनचे अर्थमंत्री!
देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्रीपदाच्या समकक्ष मानले जाते.
साजिद जावीद यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ऋषी यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे ट्रेजरी मुख्य सचिव पदाची जबाबदारी आहे. ऋषी यांच्या निवडीची बातमी ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आलेली आहे.
पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये केलेल्या बदलापैकी हा एक मोठा बदल मानला जात आहे. ऋषी हे २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण आले होते. यानंतर २०१८ मध्ये त्यांची प्रथम स्थानिक सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. नंतर, मागील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये त्यांच्याकडे ट्रेजरीच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पाण्याखालून धावणारी भारतातील पहिली मेट्रो सज्ज
देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. कारण, पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे.
कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा १९८४ मध्ये सुरु झाली होती. त्याची घौडदौड आज एकविसाव्या शतकातही सुरुच आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल बुधवारी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी सर्वसामान्य जनतेसाठी ही सेवा खुली होईल. या मेट्रोची सर्वात खास बाब म्हणजे ही मेट्रो पाण्यात बनवण्यात आलेल्या बोगद्यातून धावणार आहे. त्याचबरोबर ही देशातील सर्वात स्वस्त मेट्रो असणार आहे. एकूण १५ किमीची ही मेट्रो लाईन असणार आहे.
कमीत कमी भाडं असणार पाच रुपये
या मेट्रोनं एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनला जाण्याचं तिकीट केवळ पाच रुपये असणार आहे. दरपत्रकानुसार, दोन किमीसाठी पाच रुपये, पाच किमीसाठी १० रुपये, दहा किमीसाठी २० रुपये त्यानंतर शेवटच्या स्टेशनपर्यंत ३० रुपये इतकं भाडं आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मेट्रोमध्ये प्रवाशांना अनेक सुविधांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर, डिटेक्शन सिस्टीमसारखी आधुनिक सुविधा असणार आहे.
देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो
या मेट्रोचे सीपीआरओ इंद्राणी बॅनर्जी म्हणाले, “ईस्ट-वेस्ट मेट्रो ही भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो असेल. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन लवकरच हुबळी नदीतूनही मेट्रो मार्ग तयार करणार आहे. ईस्ट-वेस्ट मेट्रो प्रकल्पावर वेगाने काम सुरु आहे. त्यानंतर मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रवाशांना अंडर वॉटर रेल्वेचा रोमांचक अनुभव मिळेल. यापूर्वी रस्त्याच्या मार्गाने शेवटच्या थांब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ लागत होता तो आता १३ मिनिटांत पूर्ण होणार आहे.” सहा कोचची ही अत्याधुनिक मेट्रो असल्याचेही बॅनर्जी यांनी सांगितले.
आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धा : मुकुंद आहेरला सुवर्ण
ताश्कंद येथे आयोजित आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद आहेरने सुवर्णपदक पटकावून नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचे नाव वेटलिफ्टिंगमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवले आहे.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत शुक्रवारी भारतीय संघातून सहभागी झालेल्या छत्रे विद्यालयाच्या मुकुंदने १८९ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील दुसरा वेटलिफ्टिंग खेळाडू ठरला आहे. याआधी मनमाडच्याच निकिता काळेने आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते.
मनप्रीत जगातील सर्वोत्तम हॉकीपटू
भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मनप्रीत हा भारताचा पहिला हॉकीपटू ठरला आहे.
भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देताना कर्णधार म्हणून मनप्रीतने मोलाची भूमिका बजावली होती. या पुरस्कारांच्या शर्यतीत असलेला बेल्जियमचा आर्थर व्ॉन डोरेन आणि अर्जेटिनाचा लुकास व्हिया यांच्यावर मनप्रीतने मात केली. व्ॉन डोरेनला दुसऱ्या तर व्हिया याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मनप्रीतला एकूण ३५.२ टक्के मते मिळाली. त्यात राष्ट्रीय संघटना, प्रसारमाध्यमे, चाहते आणि खेळाडूंच्या मतांचा समावश आहे. व्हॅन डोरेनला १९.७ तर व्हियाला १६.५ टक्के मते मिळाली. या पुरस्कारासाठी बेल्जियमचा विक्टर वेगनेझ, ऑस्ट्रेलियाचे अरान झालेवस्की आणि ईडी ओकेनडेन यांना नामांकन मिळाले होते.
मनप्रीतने २०१२च्या लंडन आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून त्याची कारकीर्द जोमाने सुरू आहे. त्याने आतापर्यंत २६० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वर्षी मनप्रीतने एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताला विजय मिळवून देत टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान मिळवून दिले होते.