Current Affairs 15 January 2020
घागरा नदीचे नाव बदलले
घागरा नदीचे नाव बदलून त्यास ‘सरयू’ असे नाव देण्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतला असून, राज्य मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली आहे. नामबदलाचा हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. घागरा नदी गोंडातील चांदपूर कितौली गावापासून बिहारमधील रेवालगंजपर्यंत वाहते. नदी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने नाव बदलासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते, असे राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले.
डेप्युटी गर्व्हनरपदी मायकेल पात्रा
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गर्व्हनरपदी मायकेल पात्रा यांची नियुक्ती केली आहे. पात्रा हे सध्या आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी गेल्या वर्षी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. पात्रा यांचा कार्यकाळ नियुक्तीपासून ३ वर्षांचा आहे. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो व एम. के. जैन कार्यरत असून पात्रा हे चौथे डेप्युटी गव्हर्नर ठरले आहेत.
स्टेट बँकेने घटवले ठेवींचे व्याजदर
स्टेट बँक इंडिया या आघाडीच्या सरकारी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये .१५ टक्क्याने कपात केली आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व एक वर्ष ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींसाठी ही कपात करण्यात आली आहे. सुधारित दर १० जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत.
७ दिवस ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींचे व्याजदर पूर्वीएवढेच असतील. एक वर्ष ते १० वर्षे कालावधीतील ठेवींवर आता ६.१० टक्के दराने व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या ठेवींवर अर्धा टक्का अधिक व्याज मिळेल.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये सतत कपात केल्यानंतर स्टेट बँकेनेही कर्जांवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र कर्ज व ठेवींवरील व्याजदरातील तफावत सुसंगत राखण्यासाठी या बँकेला ठेवींवरील व्याजदरातही कपात करावी लागत आहे. ठेवींवरील व्याजदर घटवल्याने सर्वसामान्य ठेवीदार तसेच, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक फटका बसेल.
रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे सोमवारी वितरण
प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळांच्या बैठकींचे उच्च प्रतीची व्यावसायिक मूल्ये जपून वार्ताकन करणाऱ्या मुद्रण, प्रक्षेपण आणि डिजिटल क्षेत्रातील पत्रकारांना पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेच्या रामनाथ गोएंका पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत २० जानेवारी रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
रामनाथ गोएंका स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. या पुरस्कारांचे हे १४ वे वर्ष आहे. यंदा २५ लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून मुद्रण, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. व्यापारी, आर्थिक, क्रीडा, राजकीय वार्ताकन, चित्रपट आणि दूरदर्शन पत्रकारिता, नागरी पत्रकारिता, पर्यावरणविषयक वार्ताकन, युद्धभूमीवरील पत्रकारिता आणि प्रादेशिक भाषेतील वार्ताकन आदी वर्गवारींचा त्यात समावेश आहे.
जिंदाल स्कूल ऑफ जर्नालिझम अॅण्ड कम्युनिकेशन, ओ. पी. जिंदाल विद्यापीठाचे टॉम गोल्डसेइन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या पत्रकार पामेला फिलिपोस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण या मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.
हॉलमार्क नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्क अनिवार्य केलं आहे. केंद्र सरकार यासंबंधी आदेश जारी करणार आहे. यासाठी सोने व्यापाऱ्यांना एक वर्षांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे १५ जानेवारी २०२१ पासून फक्त हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करता येणार आहे. तसंच व्यापाऱ्यांना केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या दागिन्यांचा हॉलमार्क असलेल्या वस्तू विकता येणार आहेत. या नियमाचं उल्लंघन केल्यास एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यासोबत दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून हॉलमार्क शिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. सोने व्यापाऱ्यांना जुने दागिने विकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान सर्व व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
पदकांचे शतक, महाराष्ट्र पहिले राज्य; पूजाची गाेल्डन हॅट््ट्रिक
युवा खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राच्या संघाने तिसऱ्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये पदकांचे शतक साजरे केले. स्पर्धेत १०७ पदकांची कमाई करून शतक पूर्ण करणारे महाराष्ट्र हे यंदा पहिलेच राज्य ठरले अाहे. याच्या बळावर महाराष्ट्राने पदकतालिकेतील अापले वर्चस्व कायम ठेवले. हरियाणा संघ ६७ पदकांचा दुसऱ्या स्थानावर अाहे.
महाराष्ट्राच्या पूजा दानोळेने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनिटे ४४.७० सेकंदात वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर तिला १७ वर्षांखालील गटात सांघिक स्प्रिंट प्रकारात आदितीसह कांस्यवर समाधान मानावे लागले. त्यांनी ५४.७१ सेकंद अशी वेळ दिली. मुलांच्या अभिषेक, मयूर पवार, अश्विन पाटील यांनी १ मिनिट ०६.०९२ सेकंदांसह सुवर्णपदक मिळविले. पाठोपाठ शशिकला आगाशे व मयूरी लुटेने ४९.७३६ सेकंद वेळासह सोनेरी यश मिळविले. महाराष्ट्राला आज मयूरी लुटे हिने ५०० मीटर टाइम ट्रायल शर्यतीत रौप्य जिंकले.