⁠
Uncategorized

Current Affairs 15 March 2018

1) स्टीफन हॉकिंग, आइनस्टाइन आणि गॅलिलिओ यांचा योगायोग

ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म मृत्यू बद्दल काही योगायोग आहेत ज्यांची सांगड नेहमीच अल्बर्ट आइनस्टाइन आणि गॅलिलिओ गॅलिली यांच्याशी घातली जाते. स्टीफन यांचा मृत्यू १४ मार्चला झाला, तर आइनस्टाइन यांचा १४ मार्च हा जन्मदिवस आहे. इतकंच नाही तर दोघांचा बुद्ध्यांकदेखील समान होता. या दोघांचा बुद्ध्यांक १६० एवढा होता त्यामुळे या दोघांच्या जन्माबद्दल हे योगायोग होते. त्याचप्रमाणे गॅलिलिओ यांची ३०० वी पुण्यतिथी १९४२ साली साजरी करण्यात आली त्याच काळात स्टीफन यांचा जन्म झाला होता. त्यामुळे स्टीफन यांचा जन्म मृत्यू अनेकदा आइनस्टाइन आणि गॅलिलिओशी जोडला जातो. त्याचप्रमाणे हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन असेही म्हटले जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.

2) महाराष्ट्रातील सहाही खासदार राज्यसभेवर बिनविरोध

राज्यसभेसाठी भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी माघारी घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सहाही खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत. भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेस उमेदवार कुमार केतकर हे यंदा राज्यसभेवर गेले आहेत.

विधानसभेतील असे आहे सध्याचे संख्याबळ-

भाजप व मित्रपक्ष- 122
शिवसेना- 63
काँग्रेस- 41
राष्ट्रवादी- 41
शेकाप 3
बहुजन विकास आघाडी-3
एमआयएम – 2
मनसे – 1
सपा – 1
भारीप – 1
माकप – 1
अपक्ष-7

3) आशा बगे यांना ‘राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार’

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे प्रथमच दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार प्रख्यात लेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे. विदर्भ साहित्य संघाचे व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या आणि आयुष्यभर साहित्याची व्रतस्थपणे सेवा करणाऱ्या राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. स्त्रीकेंद्री जाणिवेच्या प्रभावी लेखिका अशी आशा बगे यांची ओळख आहे. परंपरा आणि आधुनिकता याची सांगड घालत त्यांनी सुमारे चार दशके कथा, कांदबरी, ललित असे चौफेर लेखन केले आहे. २००६ साली त्यांच्या भूमी या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला आहे.

4) एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

भारतीय हवाई कंपनी एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी हॅक झाल्याचा प्रकार घडला. अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून त्यावरून तुर्कीश एअरलाईन्सचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. या ट्विटमधील मजकूरही तुर्कीश भाषेत होता. एअर इंडियाच्या विमानांची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यापूर्वी डिसेंबर महिन्यात भाजपाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले होते.

5) अँजेला मर्केल पुन्हा जर्मनीच्या चान्सलर

जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची बुधवारी चान्सलरपदी सलग चौथ्यांना निवड केली. त्यामुळे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीमधील तीन महिन्यांची राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. सन २००५ पासून चान्सलर असलेल्या मर्केल निवडणुकीत एकमेव उमेदवार होत्या. ७०९ सदस्यांपैकी ३६४ जणांमी मर्केल यांच्या बाजूने तर ३१५ जणांनी विरोधात मतदान केले. स्वत: मर्केल यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन, फक्त बव्हेरिया प्रांतापुरता मर्यादित असलेला ख्रिश्चन सोशल युनियन आणि डाव्या विचारसरणीचा सोशल डेमोक्रॅट््स या तीन पक्षांच्या आघाडीने मर्केल यांना पाठिंबा दिला. तरी आघाडीच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा मर्केल यांना ३३ मते कमी मिळाली.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Related Articles

Back to top button