किरकोळ महागाईने गाठला 6 महिन्यांतील उच्चांक
- देशातील किरकोळ महागाईने गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाईने नवा स्तर गाठला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर २.९२ टक्के इतका वाढला आहे. मार्चमध्ये हा दर २. ८६ टक्के होता.
- केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फ किरकोळ महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये एप्रिल महिन्यात महागाईचा दर २.९२ टक्के इतका वाढल्याचं समोर आलं आहे. या महागाईचा हा सहा महिन्यांतील उच्चांक आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८मध्ये किरकोळ महागाईचा दर ३.३८ टक्क्यांवर पोहोचला होता.
- एप्रिलमध्ये फळभाज्यांच्या किंमतीत मार्चच्या तुलनेत २.८७ टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय इंधनदरांत झालेली वाढही किरकोळ महागाईसाठी मारक ठरली. एप्रिलमध्ये इंधनदर २.५६ टक्क्यांनी वाढले. त्यापूर्वीच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये इंधन दरवाढीचे प्रमाण २.५६ टक्के होते.
जी.एस. लक्ष्मी पहिल्या महिला सामनाधिकारी
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक यांनी नामिबिया विरुद्ध ओमान यांच्यातील सामन्यात पंचांची भूमिका पार पाडली. ICC ची मान्यता असलेल्या पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
- त्यानंतर आता भारताच्या नारी शक्तीचा डंका ICC मध्ये वाजला आहे. ICC ने भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांना पहिल्यावहिल्या महिला सामनाधिकारी होण्याचा बहुमान प्रदान केला आहे.
- भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची ICC च्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली आहे. हा बहुमान मिळालेल्या त्या पहिल्यावहिल्या महिला ठरल्या आहेत, असे ICC ने प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे.
- ५१ वर्षीय लक्ष्मी यांनी २००८ – ०९ मध्ये पहिल्यांदा देशांतर्गत सामन्यात सामानाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर लक्ष्मी यांनी ३ महिला आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून पद भूषवले.
‘एलटीटीई’वर आणखी पाच वर्षे बंदी
- दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत हात असलेल्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटनेवरील बंदी केंद्र सरकारने मंगळवारी आणखी पाच वर्षांसाठी वाढविली आहे.
- अवैध कारवाया (बचाव) कायद्यांतर्गत (१९६७) ही बंदी वाढविण्यात आल्याची अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१मध्ये एलटीटीईवर बंदी आणण्यात आली होती. २०१४मध्ये ही बंदी पाच वर्षांनी वाढविण्यात आली होती. आता ती पुन्हा वाढविली आहे.
डीआरडीओने केली “अभ्यास’ ची यशस्वी चाचणी
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआडीओने सोमवारी ओडिशातल्या चंडीपूर इथल्या परिक्षण केंद्रावरुन “अभ्यास’ या “हायस्पीड एक्स्पांडेबल एरिअल टार्गेट’ (हिट) ची यशस्वी चाचणी केली. या चाचणीच्या वेळी “अभ्यास’मधील विविध रडार तसेच इलेक्ट्रोऑप्टिक प्रणालीवर लक्ष ठेवण्यात आले. आणि “अभ्यास’ ने स्वत:च दिशा निश्चित करुन आपली चाचणी यशस्वी केली.
- “अभ्यास’ एका छोट्या गॅस टर्बाईनवर काम करत असून, यामध्ये स्वदेशी बनावटीच्या दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. हे अत्याधुनिक विमान देशाची सुरक्षा अधिक मजबूत करेल.