Current Affairs 16 February 2018
1) या देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा होणार मोफत
हवेतील नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी जर्मनी सारकारनं सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.जर्मनीतील 20 शहरामध्ये नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा युरोपियन महासंघाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा आधिक आहे. 2020 च्या आधी ही स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. युरोपियन महासंघाने ठरवलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या मर्यादेचे पालन करण्यात जर्मनी अपयशी ठरत आहे. लोक खाजगी वाहणांता वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे प्रदुषण वाढून हवा दुषित होत आहे. यावर उपाय म्हणून जर्मनी सरकारने सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
2) कावेरी वाद: तामिळनाडूच्या पाण्यात कपात
तामिळनाडू-कर्नाटकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कावेरी पाणी वाटप वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन न्यायालयानं तामिळनाडूच्या वाट्याच्या पाण्यात कपात केली आहे. या निर्णयानुसार तामिळनाडूला आता १४.७५ टीएमसी पाणी कमी मिळणार असून त्याचा फायदा कर्नाटकला होणार आहे. कावेरी पाणी वाटप वादावर १९९० साली लवादाची स्थापना करण्यात आली होती. तब्बल २७ वर्षांनंतर, २००७साली यावर निर्णय देताना लवादानं तामिळनाडूला ४१९ टीएमसी तर, कर्नाटकला १९२ टीएमसी पाणी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला दोन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठानं आज या प्रकरणी एकमतानं निर्णय दिला. त्यानुसार, कर्नाटकला १४.७५ टीएमसी पाणी जादा मिळणार आहे. तर, तामिळनाडूला तितकेच पाणी कमी मिळणार आहे. म्हणजेच, तामिळनाडूला ४१९ टीएमसी ऐवजी आता ४०४.२५ टीएमसी पाणी मिळणार आहे. ‘नदी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. एखाद्या राज्यातून उगम पावते म्हणून संबंधित राज्य त्या नदीच्या पाण्यावर पूर्णपणे हक्क सांगू शकत नाही,’ असंही खंडपीठानं यावेळी नमूद केलं.
@MMCurrentAffairs स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा.
3) प्रियांका चोप्रा – नीरव मोदी
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीविरोधात अभिनेत्री प्रियांका चोप्राने कायदेशीर नोटीस बजावली आहे. जानेवारी 2017 मध्ये प्रियांका नीरव मोदीच्या जाहिरातींची ब्रँड अॅम्बेसिडर झाली होती. त्यानंतर ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत नीरव मोदीच्या काही जाहिरातींमध्येही झळकली. मात्र, यासाठी झालेल्या करारानुसार मानधन न मिळाल्याचा ठपका ठेवत प्रियांकाने ही नोटीस बजावली असल्याची माहिती प्रियंका चोप्राच्या मॅनेजरने दिली आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत.
4) पुण्याच्या बालेवाडीत रंगणार ‘भारत श्री’चा थरार
येत्या 23-25 मार्चला पुण्याच्या बालेवाडीत एक इतिहास रचला जाणार आहे. 31 राज्ये आणि 8 शासकीय क्रीडा संस्थांमधील तब्बल 600 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग भारतीय शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यात येत्या 23 ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार सौष्ठवाचे प्रदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
5) हॉकी इंडियाला मिळालं ओडीशा सरकारचं प्रायोजकत्व
हॉकी इंडियाला पुढील ५ वर्षांसाठी नवीन प्रायोजकत्व मिळालं आहे. ओडीशा सरकारने पुढील ५ वर्षांसाठी हॉकी इंडियाचं प्रायोजकत्व स्विकारलं आहे. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या एका सोहळ्यात याची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघातले सर्व खेळाडू, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा हजर होते. या सोहळ्यादरम्यान भारतीय संघाच्या नवीन जर्सीचंही अनावरण करण्यात आलं. ओडीशा आणि हॉकी यांचं एक अतुट नात आहे. या राज्यातून अनेक खेळाडूंनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आतापर्यंत अनेक गरजवंत आणि गुणी खेळाडूंना हॉकी इंडियाने आपला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे या संस्थेशी जोडलं जाणं ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचं, पटनाईक म्हणाले. सध्याच्या भारतीय संघात बिरेंद्र लाक्रा, अमित रोहिदास, दिप्सन तिर्की, नमिती टोपो हे खेळाडू ओडीशाचेच आहेत. २०१८ साली होणारा हॉकी विश्वचषक हा ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे पार पडला जाणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी भुवनेश्वर हे भारताची खेळांची राजधानी बनावी अशी इच्छा व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी जानेवारी २०१८ मासिक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.