गांधींवरील पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पारितोषिक
महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
“प्रिय बापू आप अमर है” या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा व “आंतरदेशीय पत्र” या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली. स्पर्धेत ८०,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती डाक सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय डाक विभागाच्या वतीने मुंबईपेक्स या दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते, त्यावेळी पत्र लेखन स्पर्धा आयोजित केल्या बददल डाक विभागाचे कौतुक करताना या स्पर्धेत आपण स्वत: सहभागी होऊ असे राज्यपालांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आंतरदेशीय पत्रावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर निबंध लेखन करुन स्पर्धेत पाठविला होता. दरम्यान, मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक पी. सी.जगताप व सहाय्यक अधीक्षक एस डी खरात यांनी सोमवारी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना प्रथम पुरस्काराचा २५००० रुपये रकमेचा धनादेश सुपुर्द केला.
सारस्वत बॅँकेने पटकावला भारतातील दुसरा क्रमांक
फोर्ब्ज या आघाडीच्या अर्थविषयक जागतिक मासिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बॅँक असलेली सारस्वत सहकारी बॅँक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची बॅँक ठरली आहे.
सिंगापूर येथे मुख्यालय असलेली डीबीएस बॅँक ही अव्वल स्थानी विराजमान झाली आहे.
फोर्ब्ज या मासिकातर्फे मार्केट रिसर्च फर्म असलेल्या स्टॅटिस्टाच्या सहकार्याने जगभरातील २३ देशांमधील चांगल्या बॅँकांची यादी एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली.
त्यामध्ये भारतातील अव्वल स्थान डीबीएस बॅँकेने पटकविले असून सारस्वत बॅँक दुसºया स्थानावर आहे.
एचडीएफसी बॅँक तिसºया, आयसीआयसीआय बॅँक चौथ्या तर स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅँक पाचव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या स्टेट बॅँकेला अकरावे स्थान मिळाले आहे.
या सर्वेक्षणात जगभरातील ४० हजार बॅँक ग्राहकांना त्यांच्या बॅँकेशी असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बॅँकांचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक अशा बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. या ग्राहकांनी दिलेल्या उत्तरांवरून ही यादी तयार करण्यात आली आहे.
चीन-पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे
भारतापेक्षा चीन आणि पाकिस्तानकडे जास्त अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. युद्ध आणि शस्त्रास्त्रांची माहिती ठेवणाऱ्या एका आघाडीच्या थिंक टॅँकने प्रकाशित केलेल्या न्यू ईयरबुकमधून ही माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे चीन आणि पाकिस्तानला शेजारी देशांबरोबर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये खरोखर रस आहे का? हा प्रश्न निर्माण होतो.
सध्या पूर्व लडाखमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीमुळे तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून हा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या इयरबुक २०२० नुसार चीनच्या शस्त्रागारात ३२० अण्वस्त्रे तर पाकिस्तानकडे १६० आणि भारताकडे १५० अण्वस्त्रे उपलब्ध आहेत. जानेवारी २०२० पर्यंतच्या अण्वस्त्रांची ही संख्या आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
एसआयपीआरआय संस्थेच्या अहवालानुसार २०१९ च्या सुरुवातीला अण्वस्त्रांच्या बाबतीत हे तिन्ही देश याच क्रमवारीमध्ये होते. त्यावेळी चीनकडे २९०, पाकिस्तानकडे १५० ते १६० आणि भारताकडे १३० ते १४० दरम्यान अण्वस्त्रे उपलब्ध होती. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली असताना अण्वस्त्रांची ही संख्या समोर आली आहे.
मे महिन्यात महागाईने गाठला तळ
घाऊक बाजारातील महागाई निर्देशांकाने (डब्ल्यूपीआय) मे महिन्यात उणे ३.२१ टक्क्यांचा तळ गाठला आहे. इंधन दर स्थिर राहिल्याने महागाईला उतरती कळा लागली आहे. महागाई कमी झाल्याने ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. मागील साडेचार वर्षातील घाऊक बाजारातील महागाई निर्देशांकाचा हा नीचांकी स्तर आहे.
मे महिन्यात घाऊक महागाई दर कमी होण्यास इंधन आणि वीज दरांचा यांचा मोठा वाटा आहे. मात्र गेल्या महिन्यात अन्नधान्यांच्या दरात वाढ झाली. मार्च महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक १ टक्क्यावर होता. एप्रिलमधील महागाई दराची आकडेवारी पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. अन्नधान्याच्या महागाईचा दर मे महिन्यात १. १३ टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या महिन्यात तो २.५५ टक्के इतका होता.