Current Affairs 17 June 2020
‘पशुपतिनाथ’च्या सांडपाणी व्यवस्थेसाठी भारताची नेपाळला २.३३ कोटींची मदत

- भारताने नेपाळ येथील पशुपतिनाथ मंदिरात २.३३ कोटी रुपये खर्चून सांडपाणी व स्वच्छता सुविधा उभारून देण्याचे ठरवले आहे.
- पशुपतिनाथ मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी येतात, त्यामुळे तेथे अनारोग्याचा धोका नेहमीच असतो, त्यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे.
- नेपाळ-भारत मैत्री विकास भागीदारी प्रकल्पात ही सुविधा उभारून दिली जाणार आहे. सोमवारी भारतीय दूतावास, नेपाळचे संघराज्य मंत्रालय व सामान्य प्रशासन तसेच काठमांडू महानगर शहर प्रशासन यांच्यात सांडपाणी व स्वच्छता व्यवस्था उभारण्याचा समझोता करार झाला.
- भारताने यासाठी २.३३ कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून काठमांडू महानगर शहर प्रशासन त्या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. नेपाळने ठरवलेल्या निकषानुसार १५ महिन्यांत हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. पशुपतिनाथ हे नेपाळमधील मंदिर सर्वात मोठे असून ते बागमती नदी किनारी आहे. भारत व नेपाळमधून तेथे रोज भाविक येत असतात.
- नेपाळने अलिकडेच नवीन राजकीय नकाशा मंजूर करून त्यात भारतातील उत्तराखंड राज्यातील लिपुलेख, कालापानी, लिपियाधुरा या भागांवर दावा सांगितला आहे. त्याबाबत घटनादुरुस्तीला तेथील संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली होती.
महावीर चक्र राजमोहन व्होरा यांचे निधन

- महावीर चक्र विजेते माजी लेफ्टनंट जनरल राजमोहन व्होरा यांचे करोनामुळे निधन झाले.
- प्रत्यक्ष युद्धभूमीत बजावलेल्या कार्याबद्दल लष्करातील कार्यरत जवान किंवा अधिकाऱ्यांना हा महावीर चक्र पुरस्कार दिला जातो. तो लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किताब मानला जातो. त्यांना सन 1972 साली हा पुरस्कार मिळाला होता.
21 जून रोजी दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण

- 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये काही भागात सकाळी हे कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल. डेहराडून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.
- भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल.
- ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 टक्के भाग, गुवाहाटीमध्ये 80 टक्के, पाटणामध्ये 78 टक्के, सिलचरमध्ये 75 टक्के, कोलकातामध्ये 66 टक्के, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरूमध्ये 37 टक्के, चेन्नईमध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअरमध्ये 28 टक्के भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या CEO चा तडकाफडकी राजीनामा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केविन रॉबर्ट्स यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया करोनाच्या काळात आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत ८० टक्के कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय रॉबर्ट्स यांनी घेतला होता. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती.
त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे सुपूर्द केलेला राजीनामा तत्काळ प्रभावाने मंजूरदेखील करण्यात आला.
रॉबर्ट्स यांच्या जागी, सध्या T20 World Cup स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या निक हॉकले यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली आहे.
२०१८ साली जेम्स सदरलँड यांच्या जागी रॉबर्ट्स यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा करार पुढील वर्षी संपणार होता, पण त्याआधीच त्यानी अचानक राजीनामा दिला.
दरम्यान, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यानंतर भारत ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला नाही, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सुमारे २,४०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे.