Current Affairs : 17 September 2020
सहकारी बँकांवर रिझव्र्ह बँकेचे पूर्ण नियंत्रण
सहकारी बँकांमधील ठेवीदारांचे हितरक्षण केले जावे, या उद्देशाने या बँका पूर्णत्वाने रिझव्र्ह बँकेच्या देखरेख व नियंत्रणाखाली आणणाऱ्या बँकिंग नियमन कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला बुधवारी लोकसभेने मंजुरी दिली.
मुंबईतील पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेतील उघडकीस आलेल्या गैरव्यवहारानंतर, आवश्यक उपाययोजना म्हणून ‘बँकिंग नियमन (दुरुस्ती) विधेयक, २०२०’ तयार केले गेले.
तातडीने पावले टाकली जाणे आवश्यक असल्याने २६ जून रोजी वटहुकुमाद्वारे विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केली गेली. आता त्याची जागा लोकसभेने संमत कायद्यानेच घेतली आहे.
या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, हा कायदा ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आहे, सहकारी संस्था निबंधकांचे अधिकार गुंडाळण्यासाठी नाही. सहकारी बँकांच्या कारभारात व्यावसायिकता आणण्यासह, या बँकांना भागभांडवल वाढविणे सोयीस्कर ठरेल, अशा तरतुदींसह त्यांचे सशक्तीकरण हे रिझव्र्ह बँकेकडे देखरेख गेल्याने शक्य बनणार आहे.
माजी कसोटीपटू सदाशिव पाटील यांचे निधन
माजी कसोटीपटू, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी तथा एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारतीय क्रिकेट संघातून खेळलेले ते कोल्हापूरचे एकमेव खेळाडू होते.
इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थ स्टॅपोर्डशायर, नॅन्टविच या क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दुहेरी बाजूने ठसा उमटवला.
महाराष्ट्र रणजी संघाकडून त्यांनी १९५२ ते १९६४ या कालावधीत खेळताना ३६ सामन्यांत तीन अर्धशतकांसह ८६६ धावा करतानाच ३०.६६ सरासरीने ८३ बळी मिळवले.
३८ धावांत निम्मा संघ गारद करण्याची त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. कसोटीत संधी मिळणे बंद झाल्यावर त्यांनी पुन्हा महाराष्ट्र संघाकडून खेळणे सुरू ठेवले होते.
२०१७ मध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
डिसेंबर १९५५ मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची प्रथमच निवड करण्यात आली होती.
केंद्राची लोकसभेत माहिती- सहा सरकारी कंपन्या होणार बंद
केंद्र सरकारचा स्कूटर्स इंडियासह सहा सरकारी कंपन्या बंद करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
20 केंद्रीय कंपन्या आणि त्यांच्या युनिटमधील हिस्सा विकण्याची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर आहे.तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
स्कूटर्स इंडिया, हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड, भारत पंप्स अँड कंप्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफॅब, हिंदुस्तान न्यूजप्रिन्ट आणि कर्नाटक अँटीबायोटिक अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्या बंद करण्यावर सरकार विचार करत आहे.नीति आयोगाच्या निर्गुतवणुकीच्या निकषांनुसार सराकरनं 2016 पासून 34 कंपन्यांमध्ये निर्गुतवणुकीला मंजुरी दिली आहे.
यापैकी 8 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर अन्य 6 कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू आहे.याव्यतिरिक्त 20 कंपन्यांमधील निर्गुतवणुकीची प्रक्रिया निरनिराळ्या टप्प्यांवर असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात दिली.