कवठेमहांकाळमध्ये हजार वर्षांपूर्वीचा वीरगळ लेख प्रकाशात
- गेल्या आठवडय़ात विटय़ाजवळील भाळवणी येथे चालुक्य राजवटीत जैन मंदिराला दान दिल्याचा शिलालेख उजेडात आल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे याच कालखंडातील धारातीर्थी पडलेल्या वीर योद्धय़ाच्या स्मरणार्थ कोरण्यात आलेला वीरगळ लेख प्रकाशात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाने हे ऐतिहासिक संदर्भ शोधल्यामुळे सांगली परिसर सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वी चालुक्य राजवटीत महत्त्वाचा भाग होता हे स्पष्ट होत आहे.
- चालुक्य राजा दुसरा सोमेश्वर उर्फ भ्वनेकमल्ल (इ.स. १०६८ ते १०७६) याच्या कारकिर्दीत झालेल्या एका लढाईत आगळगावातील एका योद्धय़ाला वीरमरण आले होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरगळ तयार करून त्याच्यावर हा लेख कोरून ठेवण्यात आला आहे.
- आगळगाव येथे विठ्ठल मंदिराजवळ दोन वीरगळ आढळले. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापकी एकावर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. हा लेखयुक्त वीरगळ सुमारे पाच फूट उंचीचा आहे.
शोध समितीच्या शिफारशीनंतरही इस्रोप्रमुखांचा पद्मगौरव डावलला!
- पद्म किताबासाठी नेमलेल्या शोध समितीने इस्रोचे प्रमुख के. सिवन यांच्यासह २६ कर्तृत्ववंतांची शिफारस केली होती, मात्र केवळ संगीतकार शंकर महादेवन आणि प्रा. सुभाष काक हे दोघे वगळता इतरांचा
- पद्मगौरवासाठी केंद्र सरकारने विचार केला नसल्याचे समजते.
या नावांमध्ये सिवन यांच्यासह आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खक्खर आणि चित्रपट दिग्दर्शक भारतबाला गणपती यांचा समावेश होता.
ज्येष्ठ मराठी साहित्यिक, समीक्षक डॉ. गो. मा. पवार यांचे निधन
- ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. गो. मा. तथा गोपाळराव मारूती पवार (वय ८८) यांचे निधन झाले.
- त्यांनी मराठी साहित्य आणि अध्यापन क्षेत्रात सहा दशके उल्लेखनीय सेवा केली. त्यांच्या साहित्यकृतीला साहित्य अकादमीसह अन्य अनेक पुरस्कार लाभले आहेत.
- मराठी साहित्य समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धान्तिक मीमांसा करणारे डॉ. पवार हे पहिले आणि एकमेव समीक्षक आहेत. विनोद-तत्त्व व स्वरूप, मराठी विनोद-विविध आविष्काररूपे, निवडक फिरक्या, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य (मराठी व इंग्रजी), निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-भारतीय साहित्याचे निर्माते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-समग्र वाङ्मय खंड (१ व २) इत्यादी ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळासह मराठवाडा साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी कार्य केले होते. त्यांनी सुमारे १६ ग्रंथांचे लेखन केले असून ६० शोधनिबंध सादर केले होते. डॉ. पवार यांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह महाराष्ट्र फाऊंडेशनचा साहित्य पुरस्कार, सोलापूरचा भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार, वाईचा रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार आदी स्वरूपात मानसन्मान मिळाले होते.
यंदाचे पुलित्झर पुरस्कार जाहीर
- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.
- न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.
- ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
- दी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी 2018 मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता.