Current Affairs 18 December 2019
लैंगिक समानतेत भारत ११२ व्या क्रमांकावर
लैंगिक समानतेत भारत जागतिक पातळीवर चार अंकांनी घसरून ११२ व्या क्रमांकावर गेला असून महिलांचे आरोग्य, आर्थिक सहभाग या दोन निकषांत भारत खालून पाचव्या क्रमांकावर आहे.
आइसलँड जगात लैंगिक समानतेत पहिल्या क्रमांकावर असून भारत गेल्या वर्षी १०८ व्या क्रमांकावर होता तो आता ११२ व्या क्रमांकावर गेला आहे. जागतिक आर्थिक मंचाने लैंगिक समानता अहवाल जाहीर केला असून त्यात चीन १०६, श्रीलंका, १०२, नेपाळ १०१, ब्राझील ९२, इंडोनेशिया ८५, बांगलादेश ५० या प्रमाणे क्रमवारी आहे. येमेन सर्वात शेवटच्या १५३ क्रमांकावर असून इराक १५२ तर पाकिस्तान १५१ व्या क्रमांकावर आहे.
भारताने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणात १८ वा क्रमांक पटकावला असला तरी आरोग्यात १५० वा तर महिलांच्या आर्थिक सहभागात १४९ वा क्रमांक लागला आहे. शिक्षणातील लैंगिकत समानतेत भारत ११२ व्या क्रमांवर आहे. आर्थिक संधींचे महिलांतील प्रमाण पुढीलप्रमाणे आहे- भारत ३५.४ टक्के, पाकिस्तान ३२.७ टक्के, येमे २७.३ टक्के, सीरिया २४.९ टक्के, इराक २२.७ टक्के. कं पन्यांच्या संचालक मंडळात भारतात महिलांना कमी स्थान असून ते प्रमाण १३.८ टक्के तर चीनमध्ये सर्वात कमी ९.७ टक्के आहे. महिलांचे नेतृत्वातील प्रमाण पाहता भारत १३६ व्या क्रमांकावर असून हे प्रमाण १४ टक्के आहे तर व्यावसायिक व तंत्रज्ञान व्यावसायिकात तीस टक्के महिला आहेत. राजकीय सक्षमीकरणात भारत १२२ व्या क्रमांकावर आहे. कारण संसदेत १४.४ टक्के महिला आहेत. मंत्रिमंडळातील समावेशात भारत ६९ व्या क्रमांकावर असून महिलांचे प्रमाण २३ टक्के आहे. भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत एकपंचमांश वेतन मिळते त्यामुळे त्या निकषात भारत १४५ वा आहे. कामगार बाजारपेठेत महिलांचे प्रमाण एक चतुर्थाश असून पुरुषांचे प्रमाण ८२ टक्के आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन
आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या बळावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते, मराठी रंगभूमीचा अनभिषिक्त नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.
डॉ.लागू यांनी तब्बल चार दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी शंभरहून अधिक हिंदी सिनेमात आणि ४० हून अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केलं. तसेच २० हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं, वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली होती.
दक्षिण कोरिया पंतप्रधानपदी चुंग से क्यून यांची नियुक्त
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी मंगळवारी संसदेचे अध्यक्ष चुंग से क्यून यांची पंतप्रधानपदी नियुक्त केली. चुंग हे ‘मि. स्माइल’ या नावाने लोकप्रिय आहेत. यापूर्वी ली नाक-योन हे पंतप्रधान होते.
चुंग से क्यून हे वाणिज्यमंत्रिपदासह सहा वेळा कायदामंत्रिपदावर कार्यरत होते. त्यांच्या सौम्य वर्तणुकीमुळे त्यांचे वर्णन माध्यमांनी ‘सर्वांत सभ्य’ असे केले होते.
पंतप्रधानपदासाठी मून यांनी सुरुवातीला चो कूक यांच्या नावाला पसंती दिली होती; परंतु त्यांनी ऑक्टोबर महिन्यात भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चो यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे क्यून यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले.
महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव वसंत डहाके यांना
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ लेखक वसंत आबाजी डहाके यांना साहित्य जीवनगौरव, तर कृष्णात खोत, दत्ता पाटील, नितीन रिंढे फाउंडेशनच्या विविध पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.सामाजिक कार्यासाठीचे पुरस्कार राजेंद्र बहाळकर, जमिलाबेगम पठाण इताकुला, शहाजी गडहिरे यांना जाहीर झाले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार केरळ शास्त्र साहित्य परिषदेस (कोझिकोडे) देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण १२ जानेवारीला पुण्यात टिळक स्मारक मंदिरात दुपारी चार वाजता होणार आहे.
माहिती हक्क कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल. महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील.