चालू घडामोडी – १८ जून २०१६
देश-विदेश
‘एनआयएफटी’च्या अध्यक्षपदी चेतन चौहान यांची नियुक्ती
# नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार चेतन चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एनआयएफटीच्या २००६मधील घटनेनुसार नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ किंवा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ किंवा व्यावसायिकाची निवड करण्यात येते. या पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. चेतन चौहान हे दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) उपाध्यक्ष आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीदेखील आहेत. मात्र, इतक्या व्यस्त वेळापत्रकातून आपण ‘एनआयएफटी’च्या अध्यक्षपदाला न्याय देऊ शकू असे त्यांनी सांगितले.
एनएसजीसाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचे बळ
# येत्या आठवडय़ात सेऊलमध्ये होणाऱ्या अणुसाहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) महत्त्वाच्या बैठकीत भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन या गटाच्या ४८ सदस्यांना करून अमेरिकेने भारताच्या प्रयत्नांना नव्याने बळ दिले आहे. एनएसजीच्या बैठकीत भारताचा सदस्यत्वाचा अर्ज विचारासाठी येईल, तेव्हा संघटनेच्या सहभागी सरकारांनी त्याला पाठिंबा द्यावा असे अमेरिका त्यांना आवाहन करते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबी म्हणाले. २४ जूनला सेऊलमध्ये होऊ घातलेल्या एनएसजीच्या बैठकीत सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा असे पत्र या संघटनेच्या सदस्यांना लिहिणाऱ्या अमेरिकेने भारताची पाठराखण केली आहे. ‘भारताच्या प्रवेशाबाबत सहमतीला अडथळा न आणण्यास मान्यता द्यावी’, अशा आशयाचे पत्र परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी भारताच्या एनएसजीच्या सदस्यत्वाबाबत शंका असलेल्या सदस्यांना पाठवले आहे. एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताच्या प्रयत्नांना ब्रिटनचा ‘ठाम पाठिंबा’ असल्याची हमी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.
क्रीडा
रायगडचे आस्वाद पाटील राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह
# महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २६ जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा फार्स मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडला. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पदांच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दहा दिवस आधीच निवडणुकीचा निकाल लागला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांची सरकार्यवाह पदावर आणि उपनगरच्या प्रताप शिंदे यांची संयुक्त कार्यवाह पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
सतीश कुमार, मीराबाई ऑलिम्पिकसाठी पात्र
# भारताचे शिवालिंगम सतीश कुमार व सैखोम मीराबाई चानू यांना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या खेळाडूंनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाच्या राष्ट्रीय चाचणी स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवत हे तिकीट निश्चित केले. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या वरिष्ठ आशियाई स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे भारताने ऑलिम्पिकासाठी दोन प्रवेशिका निश्चित केल्या होत्या. सतीशने ७७ किलो गटात स्नॅचमध्ये १५१ किलो, तर क्लीन व जर्कमध्ये १८५ किलो असे एकूण ३३६ किलो वजन उचलले. मीराबाईने ४८ किलो गटात दोन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो वजन उचलताना स्वत:च नोंदवलेला ८४ किलो हा विक्रम मोडला. तिने क्लीन व जर्कमध्ये एन कुंजुराणी देवीने नोंदवलेल्या १०७ किलो विक्रमाची बरोबरी केली. तिने एकूण १९२ किलो वजन उचलत कुंजुराणीने नोंदवलेला १९० किलो हा विक्रम मोडला.
‘रिओ’त ऑलिंपिकपूर्वी आर्थिक आणीबाणी घोषित
# रिओ दी जानेरो – यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविणाऱ्या ब्राझीलमधील रिओ दि जानेरो राज्यात आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. राज्याचे गव्हर्नर फ्रान्सिस्को डॉर्नेल्स यांनी ही आणीबाणी घोषित केली असून, स्पर्धांच्या व्यवस्थापनासाठी फेडरल फंड्सची मागणी केली आहे. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो शहरात यंदाची ऑलिंपिक स्पर्धा पार पडणार आहेत. त्यासाठी शहरात 5 लाखांहून अधिक परदेशी नागरिक येण्याचा अंदाज आहे. स्पर्धांसाठी बहुतांश निधीची तरतूद शहर प्रशासनाने केली आहे. परंतु दळणवळण आणि कायदा व सुव्यवस्थापनाची जबाबदारी राज्य प्रशासनाची असते.
हॉकी: भारताचा पराभव; ऑस्ट्रेलिया विजेते
# लंडन : गोलरक्षक पी. श्रीजेशची अफलातून कामगिरी आणि भक्कम बचावामुळे चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत सामना खेचण्यात भारतीय संघाला यश आले; मात्र, शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने ३-१ असा विजय मिळवित स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. सामन्याच्या नियोजित वेळेमध्ये दोन्ही संघांची गोलशून्य बरोबरी झाली होती. अंतिम सामन्यात पराभव झाला असला, तरीही गोलरक्षक पी. श्रीजेश आणि इतर तरुण खेळाडूंनी दडपणाखालीही चांगली कामगिरी केल्याने भारताची ऑलिंपिक तयारी योग्य दिशेने सुरू असल्याचे चित्र दिसून आले.