गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन
- देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते.
- गोव्यात १९९०च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष हे दोनच मुख्य पक्ष होते. भाजपाने हळूहळू या राज्यात प्रवेश करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच मनोहर पर्रिकर हा गोवा भाजपचा चेहरा होता.
- मनोहर पर्रिकर १९९४ मध्ये पणजी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले. जून ते नोव्हेंबर १९९९ दरम्यान ते विरोधी पक्षनेते होते.
- २४ ऑक्टोबर २००० रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्या वेळी २७ फेब्रुवारी २००२ पर्यंत त्यांचे सरकार टिकले. नंतर ५ जून २००२ रोजी ते पुन्हा निवडून आले व मुख्यमंत्री बनले.
- २९ जानेवारी २००५ रोजी त्यांचे सरकार चार आमदारांनी राजीनामे दिल्याने अल्पमतात आले. नंतर काँग्रेसचे प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री झाले. २००७ मध्ये पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने पराभव केला. २०१२ मध्ये लोकप्रियतेवर आरूढ होत पर्रिकर यांनी २१ जागा जिंकल्या नंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. २०१४ पर्यंत त्यांची घोडदौड सुरू होती.
जम्मू-काश्मीरचे माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांची नव्या पक्षाची घोषणा
- जम्मू-काश्मीर येथील रहिवासी असलेले माजी आयपीएस अधिकारी शाह फैजल यांनी आपल्या ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ या नव्या राजकीय पक्षाची श्रीनगर येथे घोषणा केली.
- प्रशासकीय सेवेतून बाहेर पडल्यानंतर सक्रीय राजकारणात प्रवेश करण्याचे त्यांनी यापूर्वी संकेत दिले होते.
- शाह फैजल यांनी ‘जम्मू आणि काश्मीर पिपल्स मुवमेंट’ पक्षाची घोषणा केल्यानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्षा शेहला रशीद हीने या पक्षात प्रवेश केला आहे.
माजी न्या. घोष पहिले लोकपाल?
- देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे वरिष्ठ सरकारी वर्तुळातून रविवारी सांगण्यात आले.
- मे २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले ६६ वर्षीय घोष हे सध्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
- लोकपाल निवडीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील लोकपालनिवड समितीची बैठकच होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.
टोक्यो ऑलिम्पिकसाठी के.टी. इरफान पात्र ठरला:
- जपानमधील नोमी येथे झालेल्या आशियाई चालण्याच्या शर्यतीमधील 20 किलोमीटर प्रकारात राष्ट्रीय विक्रमवीर के.टी. इरफान हा चौथा क्रमांक पटकावून टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
- अॅथलेटिक्समधून 2020च्या ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यात यशस्वी ठरलेला तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
- या शर्यतीत इरफानने 20 किलोमीटरचे अंतर 1 तास 20 मिनिटे आणि 57 सेकंदांत पूर्ण केले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 1 तास 21 मिनिटे हे पात्रता निकष निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार इरफानने तीन सेकंद शिल्लक ठेवून ही पात्रता पूर्ण केली आहे. त्यामुळे इरफान आता दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.