चालू घडामोडी : 18 ऑक्टोबर २०२०
जागतिक भूक निर्देशांक अहवाल; भारत ९४ व्या स्थानावर
जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारत २०१९ मध्ये ११७ देशांच्या यादीत १०२ क्रमांकावर होता तो यावर्षी २०२० मध्ये १०७ देशांच्या यादीत ९४ क्रमांकावर आहे. याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसंच ‘वेल्ट हंगर हिल्फी’ ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे.
या यादीत बांगलादेश ७५ व्या, पाकिस्तान ७८ व्या तर म्यानमार ८८ व्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंका हे अनुक्रमे ७३ व ६४ व्या क्रमांकावर आहेत. या दोन देशांमध्ये कुपोषणाची समस्या त्यांच्या शेजारी देशांइतकी गंभीर नाही.
भारतामध्ये ५ वर्षे वयाखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण ३७.४ टक्के आहे. कुपोषणाने मरण पावणाऱ्या बालकांचे प्रमाण ३.७ टक्के आहे. तर उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेल्या बालकांचे प्रमाण १७.३ टक्के आहे. त्यावरून भारतामध्ये कुपोषणाची समस्या किती खोलवर रुजली आहे हे दिसून येते.
न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी जसिंडा आर्ड्रन यांची फेरनिवड
न्यूझीलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जसिंडा आर्ड्रन दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.
निवडणुकीत पराभव झाल्यास पक्षनेतेपदाचा त्याग करण्याची घोषणा जसिंडा आर्ड्रन यांनी केली होती, पण त्यांच्या मजूर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला.
र्आड्रन यांच्या उदारमतवादी मजूर पक्षाला ४९ टक्के मते मिळाली, त्यांचा मित्रपक्ष- ग्रीन पार्टीला ७.६ टक्के, तर मुख्य प्रतिस्पर्धी पुराणमतवादी नॅशनल पार्टीला २७ टक्के मते मिळाली.
न्यूझीलंडने प्रमाणात्मक मतदान प्रणाली स्वीकारल्यानंतर २४ वर्षांत असे स्पष्ट बहुमत कधीच एका पक्षाला मिळाले नव्हते. पूर्वी राजकीय आघाडय़ा तयार करणे भाग पडत असे, पण यावेळी आर्ड्रन यांच्या मजूर पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले आहे.
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा ; कार्लसनला विजेतेपद
विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने अल्टिबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद एक फेरी बाकी ठेवून पटकावले.
पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात झालेल्या या स्पर्धेत त्याने इराणच्या १७ वर्षीय अलिरेझा फिरुझाला पराभूत के ले.
नॉर्वे येथील स्टॅवॅँगर शहरात पार पडलेल्या या स्पर्धेत कार्लसनने फिरुझाविरुद्ध काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना रेटी पद्धतीने खेळ सुरू केला. कार्लसनने ६९ चालींमध्ये फिरुझाला नमवले.
याबरोबरच ९ फेऱ्यांअखेर १९.५ गुणांची दणदणीत आघाडी घेत कार्लसनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. फिरुझाने मधल्या टप्प्यावर काही चालींनी कार्लसनला थोडेफार चकित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कार्लसनने अखेर हत्ती, घोडा या प्याद्यांचा सुरेख वापर करत विजय खेचून आणला. स्पर्धेत फिरुझा १५.५ गुणांसह दुसऱ्या, लेव्हॉन अरोनियान १४.५गुणांसह तिसऱ्या आणि फॅबियानो कॅरुआना १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत.