वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा : भारताच्या रवीला सुवर्णपदक
भारताचा युवा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने शनिवारी सलग दुसऱ्या वर्षी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले.
अनुभवी बजरंग पुनियाला मात्र दुखापतीमुळे सुवर्णपदकावर पाणी सोडावे लागले, तर करन आणि नरसिंह यादव यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकल्या.
पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात रवीने अंतिम फेरीत इराणच्या अलिरेझा सारलकला ९-४ असे पराभूत केले.
गतवर्षी रवीने जपानच्या युटो ताकेशिटाला नमवून सुवर्णपदक मिळवले होते.
करनने ७० किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या सेनबोंग लीला ३-१ असे हरवले. नरसिंहने इराणच्या अहमद अल बुरीला ८-२ अशी धूळ चारून कांस्यपदक मिळवले. भारताने सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके जिंकून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके जमा आहेत.
वेटलिफ्टिंग : झिलीने पटकावले सुवर्णपदक
भारताच्या झिली डालाबेहेराने आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
झिली ४५ किलो गटात अव्वलस्थानी राहिली. कनिष्ठ जागतिक स्पर्धेची कांस्य विजेता झिलीने स्नॅचमध्ये ६९ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ८८ किलो वजन उचलले.
एकूण १५७ किलो वजन उचलत तिने सुवर्णपदक आपल्या नावे केले. ती तिन्ही प्रकारांत पहिल्या स्थानी राहिली.
ही स्पर्धा ऑलिम्पिकची पात्रता स्पर्धा आहे. गतवर्षी स्थगित करण्यात आली होती.
उझबेकिस्तान जलतरण स्पर्धा : श्रीहरी नटराजला दुसरे सुवर्णपदक
भारताचा अव्वल जलतरणपटू श्रीहरी नटराज याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत उझबेकिस्तान खुल्या जलतरण स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक पटकावले.
२० वर्षीय श्रीहरीने २५.११ सेकंद अशी कामगिरी नोंदवत सुवर्णपदक प्राप्त केले.
साजन प्रकाशनेही चार सुवर्णपदके कमावली. त्याने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात ५३.६९ सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले.
२०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १.५७.८५ सेकंद अशी कामगिरी नोंदवत सुवर्णपदक प्राप्त केले.
कोपा डेल रे चषक फुटबॉल: मेसीच्या दोन गोलमुळे बार्सिलोनाला जेतेपद
लिओनेल मेसीच्या शानदार कामगिरीमुळे बार्सिलोनाने अॅथलेटिक बिलबाओचा ४-० असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.
अँटोनी ग्रिझमन याने ६० व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी २-० अशी वाढवली.