⁠  ⁠

चालू घडामोडी :१९ फेब्रुवारी २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Current Affairs 19 February 2020

मेसी, हॅमिल्टन, सचिन तेंडुलकरला लॉरेयो पुरस्कार

sp 3

ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांनी यंदाच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लॉरेयो पुरस्कारावर संयुक्तपणे नाव कोरले आहे. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समान मते मिळाल्यामुळे दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही. या दोघांनी गोल्फपटू टायगर वुड्स, केनियाचा धावपटू इलिड किपचोग, टेनिसपटू राफेल नदाल आणि मोटोजीपी विजेता मार्क मार्केझ यांच्यावर मात करत हा पुरस्कार पटकावला.
२०१९च्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवणारी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या चार वर्षांतील तिचा हा तिसरा पुरस्कार ठरला. याआधी तिने २०१७ आणि २०१९मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले होते. तिने जमैकाची धावपटू शेली अ‍ॅन-फ्रेसर-प्राइस, टेनिसपटू नाओमी ओसाका, अमेरिकेची अ‍ॅथलीट अ‍ॅलिसन फेलिक्स यांचे आव्हान मोडीत काढले.
दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाने जर्गेन क्लॉप यांच्या लिव्हरपूल आणि अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघावर मात करत लॉरेओ जागतिक सांघिक पुरस्कारावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिका रग्बी संघाने २०१९मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.
सचिन तेंडुलकर
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला लॉरेन्स क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गेल्या २० वर्षात प्रथमच हा पुरस्कार एखाद्याला मिळाला आहे. २०११च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणासाठी सचिनला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Asian Wrestling Championship : सुनील कुमारला सुवर्णपदक

Sunil Kumar

नवी दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुनील कुमारने इतिहास घडवला आहे.
८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने अंतिम फेरीत किर्गिस्तानच्या अझत साल्दिनोव्हचा ५-० ने पराभव केला. तब्बल २७ वर्षांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ग्रेको रोमन प्रकारात सुवर्णपदक मिळालं आहे.
उपांत्य फेरीत सुनील कुमारचं आव्हान संपुष्टात येण्याची दाट शक्यता होती. कझाकिस्तानचा प्रतिस्पर्धी अझामत कुस्तुबायेव १-८ च्या फरकाने आघाडीवर होता. मात्र सुनीलने अखेरच्या क्षणात डाव पलटवत सलग ११ गुणांची कमाई करत धक्कादायक विजयाची नोंद केली. १२-८ च्या फरकाने सुनीलने उपांत्य सामन्यात बाजी मारली.
२०१९ साली झालेल्या स्पर्धेतही सुनीलने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र त्या स्पर्धेत सुनीलला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. याव्यतिरीक्त ५५ किलो वजनी गटात भारताच्या अर्जुन हलकुर्कीने ग्रेको-रोमन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

S-400 सिस्टिम वेळेत देण्याचा रशियाचा शब्द, संरक्षण व्यवहार १६ अब्ज डॉलरच्या घरात

s400 missile fast

संरक्षण क्षेत्रात रशियाने भारताला नेहमीच मोलाची मदत केली आहे. युद्धासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याच्या पुरवठयाबरोबर उत्पादनाची टेक्नोलॉजी भारताला दिली आहे. लवकरच दोन्ही देशांमधील संरक्षण व्यवहार १६ अब्ज डॉलरच्या पुढे जाणार आहे. एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमसह, कालाश्नीकोव्ह रायफल्स, कामोव्ह हेलिकॉप्टर्स या करारांची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.
अलीकडेच लखनऊनमधील डिफेन्स एक्सपोमध्ये भारत-रशियामध्ये १४ सामंजस्य करार झाले. कामोव्ह केए-२२६ हेलिकॉप्टर्ससाठी लागणाऱ्या सुट्टया भागांच्या निर्मितीसाठी रशियन हेलिकॉप्टर्स बरोबर सामंजस्य करार झाला आहे. कामोव्ह केए-२२६ ही २०० हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याची भारताची योजना आहे. भारताला २०२५ पर्यंत रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिम मिळणार आहे. कलाश्निकोव्ह एके-२०३ मशीन गन आणि केए-२२६ टी बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची संयुक्त भागदारी प्रकल्पातंर्गत निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी करणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.
S-400 मिसाइल सिस्टिम खरेदी व्यवहारात भारताने रशियाला ६ हजार कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. एस-४०० चे वैशिष्टय म्हणजे ही सिस्टिम शत्रूची फायटर विमाने, ड्रोन, आणि मिसाइल्स शोधून नष्ट करण्यास सक्षम आहे. भारताने ऑक्टोंबर २०१८ मध्ये रशियाबरोबर पाच एस-४०० सिस्टिम खरेदीचा करार केला आहे. एकूण ४० हजार कोटीचा हा व्यवहार आहे.

पंढरीनाथ पठारे यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार

l 12 4

कुस्तीमधील ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि मार्गदर्शक पंढरीनाथ पठारे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याचप्रमाणे युवराज खटके (अ‍ॅथलेटिक्स), बाळासाहेब आवारे (कुस्ती), नितीन खत्री (तायक्वांदो), जगदीश नानजकर (खो-खो) आािण अनिल पोवार (पॅराअ‍ॅथलेटिक्स) या पाच जणांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत २०१८-१९ या वर्षांसाठी ६३ जणांना शिवछत्रपती पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली.
गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ३०६ खेळाडूंनी पदक जिंकत अग्रस्थान मिळवून दिले. या विजेत्यांना एकूण सव्वातीन कोटी रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Share This Article