IIFA Awards 2019 : आयफा पुरस्कारावर यांनी कोरलं नाव!
- इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार सोहळा म्हणजे कलाकारांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. हा सोहळा गेल्या काही वर्षांपासून निरनिराळ्या देशांमध्ये साजरा करण्यात येत आहे. मात्र यंदाचा हा पुरस्कार सोहळा मुंबईमध्ये पार पडला. यंदा या सोहळ्याचं हे २० वर्ष होतं. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांना IIFA Awards 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
- ‘राजी’ या चित्रपटातून दमदार भूमिका करत कलाविश्वामध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या अभिनेत्री आलिया भटला यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर अभिनेता रणवीर सिंगला ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी)
सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – सारा अली खाल (केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- इशान खट्टर
(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पदुकोण
(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वर्षातील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर
गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम
गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)
सर्वोत्कृष्ट संगीत- ‘सोनू के टिटू की स्वीटी’
सर्वोत्कृष्ट कथा- ‘अंधाधुन’
जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी
सर्वोत्कृष्ट गीतकार – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राझी)
World Wrestling Championships : विनेश फोगटला कांस्यपदक
- भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. ५३ किलो वजनगी गटात विनेशने ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीवर ४-१ ने मात केली. कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत विनेशने बुधवारी दुपारी रेपिचाजचे दोन्ही राऊंड जिंकत २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं.
- या कामगिरीसह २०२० टोकियो ऑलिम्पिकला पात्र होणारी विनेश पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : जागतिक स्पर्धेतून हिमा दासची माघार
- जागतिक कनिष्ठ विजेत्या हिमा दासने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.
- ‘‘दोहा येथे होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतून हिमाला पाठीच्या दुखापतीमुळे दुर्दैवी माघार घ्यावी लागत आहे,’’ अशी माहिती भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली.
- २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत हिमाचा ४ बाय ४०० मीटर महिला आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघात समावेश करण्यात आला होता
ई-सिगारेटवर बंदी!
- ई-सिगारेटवर केंद्र सरकारने बुधवारी देशभर बंदी लागू केली. तरुणाईला या ई-सिगारेटने व्यसनाच्या विळख्यात ओढल्याचा दावा करीत ही बंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांत याआधीच बंदी लागू आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, साठवणूक, जाहिरात तसेच आयात-निर्यात हा गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड आणि एक वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. एकापेक्षा जास्त वेळा नियमभंग केल्यास पाच लाखांचा दंड आणि तीन वर्षांंचा तुरुंगवास होऊ शकतो.
- १० जुलै २०१९ रोजी सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार १ लाख ९१ हजार ७८१ डॉलरच्या ई-सिगारेटची आयात झाली होती. चीन, अमेरिका, हाँगकाँग आणि जर्मनीतून ही आयात झाली होती. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या २०१८मधील आकडेवारीनुसार सुमारे ३० लाख शालेय विद्यार्थी ई-सिगारेटचा वापर करीत होते.
देशभरात 2 ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे.
- त्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असून सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल असं म्हटलं होतं.